मुंबई : राज्यातील करोनाची साखळी तोडण्यासाठी लागू असलेले निर्बंध पाच स्तरांत शिथिल करीत सरकारने जनतेला दिलासा दिला आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी शाळा-महाविद्यालये आणि सर्व धार्मिक स्थळे मात्र बंदच राहणार असल्याचे सरकारने सोमवारी स्पष्ट

के ले. तसेच साप्ताहिक बाधितांचे प्रमाण आणि प्राणवायुयुक्त खाटांची उपलब्धता याच्या आधारे प्रत्येक शुक्रवारी शहर अथवा जिल्ह्य़ाचा स्तर निश्चित करावा आणि सोमवार ते रविवार त्याची अंमलबजावणी करावी असे स्पष्ट आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत.

राज्यात एप्रिल महिन्यापासून कठोर निर्बंध लागू आहेत. गेल्या काही दिवसांत बाधितांच्या प्रमाणात झालेली घट आणि या आजारावर मात करणाऱ्यांच्या प्रमाणात झालेली वाढ एकू णच राज्यातील करोनास्थिती नियंत्रणात आल्यानंतर सरकारने सोमवारपासून निर्बंध काही प्रमाणात शिथिल के ले आहेत. मात्र करोनाचा धोका अजून टळलेला नसल्याने धार्मिक स्थळे तसेच शिक्षण संस्था बंदच ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी दिली.

शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था तसेच परीक्षा घेणे, प्रार्थना स्थळे, खासगी शिकवणी वर्ग, कौशल्याचे वर्ग, खेळांच्या स्पर्धा, धार्मिक-सामाजिक-राजकीय सार्वजनिक कार्यक्रम याबाबत ४ जूनपर्यंत जे निर्बंध होते, तेच कायम राहतील. याबाबत कोणतीही सवलत देण्यात आलेली नसल्याचे सरकारने स्पष्ट के ले आहे.

करोनाशी संबंधित आवश्यक सेवा, लसीकरण, जनजागृती मोहीम यासारख्या कामासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना स्थानिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्याकडून विशेष परवानगी घ्यावी लागेल. तसेच पालिका आणि जिल्ह्य़ात कोणता स्तर आणि निर्बंध ठेवायचे याबाबतचा निर्णय घेण्याची मुभा जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना देण्यात आली असली तरी निकषाबाहेर जाऊन निर्णय घेण्यापूर्वी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल.

सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्यांची प्रतीजन किं वा आरटी-पीसीआर चाचणी आवश्यक नाही. के वळ करोनाची लक्षणे दिसत असतील अशा व्यक्तींसाठी कोणत्याही संस्था/गृहनिर्माण संस्थेत प्रवेशापूर्वी करोना चाचणी करणे बंधनकारक राहील.

तसेच सर्व अभ्यागतांचे थर्मल स्कॅनिंगही बंधकारक राहील. एखाद्या मॉलमध्ये असलेली किंवा मल्टिप्लेक्सशी संलग्न उपाहारगृहे यांच्यासंदर्भात मॉल आणि उपाहारगृहासाठी असलेले दोन्ही नियम लागू होतील. म्हणजेच दोन्हीपैकी कोणत्याही मार्गदर्शक सूचनांनुसार बंद करणे बंधनकारक असल्यास उपाहारगृह बंद ठेवण्यात यावे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारचे स्पष्टीकरण

* महापालिका अथवा जिल्ह्य़ात कोणत्या दिवसाचा साप्ताहिक बाधित दर ग्राह्य़ धरावा याबाबतही सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

* प्रत्येक गुरुवारी मागील सात दिवसांतील दैनंदिन करोनाबाधित दराची साप्ताहिक सरासरी ग्राह्य़ धरावी. ही सरासरी आणि वापरात असलेल्या प्राणवायू खाटा यांच्या गुरुवारच्या आकडेवारीच्या आधारे त्या बंधनाचा स्तर शुक्रवारी घोषित करावा.

* या स्तराची अंमलबजावणी त्यापुढील सोमवारपासून आठवडाभर करावी. तसेच या नव्या स्तर आणि त्याअनुषंगाने लागू होणाऱ्या निर्बंधांबाबत सर्व नागरिकांना किमान ४८ तास आधी सूचना द्यावी.

* एकदा एका स्तराची घोषणा झाल्यावर तो स्तर एका आठवडय़ासाठी, किमान सोमवार ते रविवार या काळात लागू ठेवावा असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.