भारताच्या आधुनिकीकरणात विज्ञान व संशोधनाचा सिंहाचा वाटा आहे. विज्ञानाविषयी प्रेम निर्माण व्हायला हवे, अधिकाधिक संख्येने वैज्ञानिक व संशोधक देशात निर्माण व्हायला पाहिजे. मात्र, अनेकदा लहानमोठय़ा नियमांवर बोट ठेवून संशोधक व अभ्यासकांची कुचंबणा केली जाते. लालफितीचा हा कारभार प्रगतीच्या वाटा रोखतो. त्यामुळेच विज्ञान व संशोधनाला या लालफितीच्या जाचातून मुक्तता मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे शनिवारी दिली. १०२व्या भारतीय विज्ञान परिषदेच्या निमित्ताने ते येथे आले होते.
मुंबई विद्यापीठात भरलेल्या ‘भारतीय विज्ञान परिषदे’चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते शनिवारी
सकाळी झाले. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन, राज्यमंत्री वाय. एस. चौधरी, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ संशोधक डॉ. वसंत गोवारीकर यांना श्रद्धांजली अर्पण करून मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. मोदी पुढे म्हणाले, ‘भारताच्या आधुनिकीकरणातील विज्ञानाचे महत्त्व आपण जाणतो. विज्ञानाविषयी आपल्या समाजात प्रेम निर्माण व्हायला हवे. शेतीचा दर्जा सुधारणे, ग्रामीण भागाला आवश्यक तंत्रज्ञान परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे, दर्जेदार आरोग्यव्यवस्था उभारणे आणि भारताला उत्पादन क्षेत्रात अग्रेसर बनवणे हे विज्ञान-तंत्रज्ञानामुळेच शक्य होईल. तसेच, हे विज्ञान-तंत्रज्ञान या देशातील गरीब, दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. भारताच्या समृद्ध भविष्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान यांना राष्ट्रीय प्राधान्यक्रम मिळायला हवा’. आपली शेती लहरी हवामानाला पूरक ठरेल असे बदल शेतीव्यवस्थेत करण्यासाठी संशोधकांनी अभ्यास करायला हवा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
गेल्या पाच वर्षांत आपण नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानभरपाईपोटी तब्बल आठ हजार कोटी मोजले होते, याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.  या वेळी देशोदेशीचे नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ व इतर प्रतिष्ठित संशोधकांचा सत्कार पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला.  

वेळुकरांचा अनुल्लेख
विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू राजन वेळुकर हेदेखील परिषदेच्या उद्घाटनाला उपस्थित होते. डॉ. हर्षवर्धन यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाकरिता उभे राहिले. त्यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा नावासहित उल्लेख केला. मात्र, वेळुकर यांचे नाव त्यांनी घेतले नाही. उच्च न्यायालयाने मारलेल्या ताशेऱ्यांमुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वेळुकर यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक टाळला अशीच चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

नेहरूंचे कौतुक
स्वातंत्र्योत्तर काळात पं. जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाला देशाच्या विकासाच्या गाभा मानला. आपल्या संशोधकांनी पायाभूत संशोधनाने आणि उत्कृष्ट संस्था उभारून विज्ञान-तंत्रज्ञानात देशाला पुढे नेले, याची आठवण मोदी यांनी जागविली.

वैज्ञानिक व संशोधकांनी विज्ञानातील रहस्ये उलगडावीत. संशोधनाकरिता आलेले निधीचे प्रस्ताव, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी लागणाऱ्या मान्यता, संशोधनाला
मान्यता देणारे अर्ज फार काळ रेंगाळू नयेत. तसेच निधीबाबतच्या प्रस्तावांमध्येही लवचिकता यावी.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान