युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मरिन ड्राइव्ह येथे बसविण्यात आलेल्या व्यायाम उपकरणांच्या संरक्षणाची जबाबदारी दक्षिण मुंबईतील शिवसैनिक आणि युवा सैनिकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे व्यायाम उपकरणांजवळ ही मंडळी २४ तास गस्त घालत आहेत. शिवसेनेची ही गस्त रामप्रहरी समुद्रकिनाऱ्यावर व्यायामाच्या निमित्ताने येणाऱ्या मंडळींचा चेष्टेचा विषय बनली आहे.
भल्यापहाटे समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्यांना व्यायाम करता यावा यासाठी अभिनेता दिनो मारिया याने तेथे व्यायाम साधने उपलब्ध करण्याची कल्पना आदित्य ठाकरे यांच्याकडे मांडली होती. मरिन ड्राइव्ह येथे दोन ठिकाणी ही साधने बसविण्यासाठी डी. एम. फिटनेस या कंपनीने पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाकडून परवानगी घेतली; परंतु प्रत्यक्षात यापैकी एक उपकरण ‘सी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत बसविले. त्यामुळे या विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ते काढून टाकले; परंतु वरिष्ठांचे आदेश येताच ते पुन्हा होते त्याच जागी उभारण्यात आले. यावरून विरोधी पक्षाने सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

शिवसेनेने व्यायाम उपकरणांचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला आहे. पालिकेने पुन्हा कारवाई करू नये यासाठी परिसरात सैनिकांची गस्त वाढविली आहे. शिवसेनेतर्फे अचानक बसविण्यात आलेले व्यायाम उपकरण आणि त्यावर पालिकेने केलेली कारवाई हा या मंडळींचा उत्सुकतेचा विषय बनला होता. कारवाईनंतर पालिकेने पुन्हा त्याच जागी बसविलेल्या व्यायाम उपकरणाच्या आसपास रेंगाळणारे शिवसैनिक-युवा सैनिक व्यायाम करण्यासाठी येणाऱ्यांच्या चेष्टेचा विषय बनू लागले आहेत.