दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सुरुवातीपासून मतपेटीवर डोळा ठेवून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकारण शिजू लागले होते. गोविंदा पथकांना दिलासा देण्यासाठी भाजपने मुंबईत १५० ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्याची घोषणा केली, तर शिवसेनेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा बहाणा करीत ठिकठिकाणी उत्सवाचे आयोजन केले. यावरून आता शिवसेना आणि भाजप नेते परस्परांवर कारवाई करण्याची भाषा बोलू लागले आहेत.

न्यायालयाचे आदेश आणि राज्य सरकारचे धोरण यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, अशी मागणी दहीहंडी समन्वय समिती सुरुवातीपासूनच करीत होती. मात्र सरकारने नरोवा कुंजरोवा भूमिका घेतल्याने अखेपर्यंत हा संभ्रम दूर होऊ शकला नाही. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने तरुणाई मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरते. ही युवाशक्ती आपल्याकडे आकर्षित व्हावी यादृष्टीने दोन्ही पक्षांचे प्रयत्न सुरू होते. न्यायालयाच्या आदेशाचे आपल्याकडून उल्लंघन होऊ नये म्हणून दोन्ही पक्षाचे नेते काळजी घेत होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दहीहंडीच्या आयोजनातून माघार घेतल्याने शिवसेना आणि भाजपपुढे पेच निर्माण झाला. परिणामी भाजपने मुंबईत १५० ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करून पथकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नेत्यांनीही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे निमित्त पुढे करून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्याची घोषणा केली.
शिवसेना आणि भाजपने मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडय़ा बांधल्या. या दहीहंडय़ा फोडण्यासाठी बहुसंख्य पथकांनी पाचपेक्षा अधिक थर रचले.