विक्री केंद्र सुरू करण्यात भाजपच्या खासदार-आमदारांचा निरुत्साह
तूरडाळीचे दर प्रति किलो १५० ते २०० रुपयांहून अधिक असताना भाजपच्या ३५ विक्री केंद्रांवर ती ८० ते १०० रुपये किलो दराने उपलब्ध होती, तर ‘बिग बाजार’ने १७ दुकानांमधून ९९ रुपये प्रति किलो दराने तूरडाळ शनिवारी उपलब्ध करून दिली. राज्य सरकारने छापा टाकून सील ठोकलेल्या एकाही गोदामामधून व्यापाऱ्यांनी हमीपत्र भरून डाळ सोडविलेली नाही. त्यामुळे ही डाळ सील केलेली नसून व्यापाऱ्यांच्या संघटनेने काही ठरावीक दुकाने आणि भाजपला स्वस्त डाळ उपलब्ध करून देण्यामागे श्रेयाचे किंवा अन्य काही राजकारण आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी धडपड करून विक्री केंद्रे सुरू केली असली तरी शहरातील भाजपच्या खासदार-आमदारांनी मात्र त्यासाठी फारसा रस दाखविलेला नसून शिवसेना तर थंडच आहे.
तूरडाळीसह अन्य डाळींच्या वाढलेल्या प्रचंड दरांमुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याने ‘तूरडाळ १०० रुपये प्रति किलो दराने गुरुवारपासून सर्वत्र उपलब्ध होईल’, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केली. पण गेल्या दोन दिवसांत तूरडाळीचे दर प्रति किलो १५० ते २०० रुपयांहूनही अधिक आहेत. मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्य़ात सुमारे १३ हजार मेट्रिक टन डाळ सरकारने सील केली असून हमीपत्र भरून ती सोडवावी, अशी पत्रे पाठवूनही व्यापारी त्यासाठी अजून पुढे आलेले नाहीत. व्यापाऱ्यांच्या मालमत्तेची कागदपत्रे, तीन वर्षे भरलेले प्राप्तिकराचे रिटर्न्‍स यासह अन्य कागदपत्रे देण्यास व्यापारी राजी नसल्याने या अटी सरकारला कमी कराव्या लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे गाजावाजा करून सरकारने सुमारे ८७ हजार मेट्रिक टन डाळी व तेलबियांचा साठा सील केला, त्यातून नेमके काय साध्य झाले, हा प्रश्न निर्माण झाला आहे. उडीद, मूग यासह अन्य डाळींचे दर बाजारात योग्य आहेत, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे केवळ तूरडाळ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. सील केलेली डाळ सोडविली गेली नसताना भाजपच्या केंद्रांवर व बिग बाजारमध्ये स्वस्त डाळ उपलब्ध आहे. मात्र अपना बाजार, सहकार भांडार, ग्राहक पंचायतीची भांडारे यांसारख्या संस्था आणि अन्य मॉल्ससाठी स्वस्त डाळ का दिली जात नाही, यामागे राजकीय गणिते व वेगळी समीकरणे काय आहेत, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सत्तेमुळे शिवसेना थंड?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महागाईविरोधात टीकेची झोड उठविल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना तूरडाळीचे दर कमी करण्यासाठी निवेदन दिले. पण त्यापलीकडे काहीच केले नसून युती शासनाच्या काळात पाच वर्षे पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणारी शिवसेना ही भाजपच्या सरकारमध्ये सामील असल्याने थंड झाली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपच्या खासदार-आमदारांचा पुढाकार नाही
‘बिग बाजार’ने १७ दुकानांमधून शनिवारी ९९ रुपयांमध्ये तूरडाळ उपलब्ध केली असून रविवारपासून २३ ठिकाणी ती होईल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मुंबईत भाजपतर्फे १०० केंद्रे सुरू करून १०० रुपये प्रति किलो दराने तूरडाळ उपलब्ध केली जाईल, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व अ‍ॅड. शेलार यांनी केली होती. भाजपचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या, पूनम महाजन, गोपाळ शेट्टी यांच्यासह बहुतांश आमदारांनीही विक्री केंद्रे सुरू करण्यासाठी फारसा रस किंवा पुढाकार घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अ‍ॅड. शेलार यांनी मुंबईत ३५ केंद्रांवर २२ हजार किलो डाळ उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.