शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथील सावरकर स्मारकात घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यावर हा पहिलाच दसरा मेळावा आहे.

करोनामुळे गर्दी करण्यावर निर्बंध आहेत. जाहीर कार्यक्रम, विवाह समारंभ, अंत्यसंस्कार, सार्वजनिक उत्सव व अन्य बाबींवर निर्बंध आहेत, मंदिरे बंद आहेत. या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा कसा घेता येईल, यावर शिवसेनेकडून विविध पर्यायांवर विचार सुरू आहे. हा मेळावा शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर घेण्याची प्रथा असल्याने पावसाची शक्यता व करोना निर्बंध यामुळे सावरकर स्मारकात मेळावा घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. सावरकर स्मारकात व्यासपीठ उभारून ठाकरे यांचे भाषण लाइव्ह प्रक्षेपित केले जाईल, याबाबत नियोजन सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले.