ज्येष्ठ नागरिकांना करोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असून त्यांच्यामधील या विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना सोमवारी जारी केल्या आहेत. देशात बंद आणि संचारबंदीसाख्या उपाययोजनांतून करोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही समाज माध्यमाद्वारे जनतेशी वारंवार संवाद साधून करोनाला रोखण्यासाठी घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन केले आहे. करोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येकाने सहभागी होऊन शासनाने घातलेल्या र्निबधांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांना करोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. वयोमानानुसार कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती हे महत्त्वाचे कारण असले तरी अनेक ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, दमा किंवा श्वसनाचे विकार आदी व्याधी असतात. या पार्श्वभूमीवर करोना संसर्गाचा ज्येष्ठांना असलेला अधिक धोका टाळण्यासाठी या विषाणूच्या संसर्गापासून दूर राहावे लागणार आहे. ज्येष्ठांना मार्गदर्शक सूचना हे करा! * घरीच रहा. घरी येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांच्या किंवा अभ्यागतांच्या भेटी घेणे टाळा. भेटणे अगदीच आवश्यक असेल तर बोलताना किमान एक मीटरचे अंतर राखा. * थोडय़ा-थोडय़ा वेळाने आपला चेहरा आणि हात साबणाने स्वच्छ धुवा. * खोकताना किंवा शिंकताना आपल्या शर्टची बाही, हातरूमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करून तोंड झाका. खोकून किंवा शिंकून झाल्यांनतर रूमाल किंवा कपडे साबणाने स्वच्छ धुवून घ्या आणि टिश्यू पेपर झाकणबंद असलेल्या कचरा डब्यात टाका. * घरी बनविलेला ताजा आणि पोषक आहार घ्या, या आहारातून आपल्या कुटुंबाला योग्य पोषण मिळेल याची काळजी घ्या. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी वारंवार भरपूर पाणी प्या. शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ताज्या फळांचा रस प्या. * आपल्याला असलेली पथ्ये पाळा. डॉक्टरांनी दररोज घ्यायला सांगितलेली सर्व औषधे नियमितपणे घ्या. * स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या. जर सर्दी, कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास यासारखी लक्षणे आढळून आल्यास त्वरित जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दाखवा, त्यांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करा. हे करू नका! * शिंक किंवा खोकला आल्यास मोकळ्या हातावर किंवा चेहरा न झाकता खोकू किंवा शिंकू नका. * आपल्याला ताप, खोकला किंवा सर्दी असेल तर कोणाच्याही जवळ जाऊ नका. * आपले डोळे, नाक, जीभ किंवा चेहऱ्याला स्पर्श करू नका. * आजारी किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या अजिबात जवळ जाऊ नका. * डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या मनाने कोणतेही औषध किंवा गोळ्या घेऊ नका. * कोणाचीही गळाभेट घेऊ नका अथवा हस्तांदोलन सुद्धा करू नका. * सध्याची परिस्थिती पाहता नियमित तपासणी किंवा फॉलोअप असेल तरीही त्यासाठी दवाखान्यात जाऊ नका. अगदीच आवश्यक असल्यास फोनवरुन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे (टेलिकन्सल्टिंग) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. * बाजारपेठ, बाग-उद्याने, धार्मिक स्थळे अशा गर्दीच्या ठिकाणी अजिबात जाऊ नका. * अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा, अन्यथा घरातच रहा.