शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचा आज नालेसफाई दौरा
नालेसफाई घोटाळा उघडकीस आल्यानंतर पालिका आयुक्तांनी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारताच राजकारण्यांचे धाबे दणाणले होते. आता सावध पवित्रा घेत सत्ताधारी शिवसेनेने पावसाळ्यात मुंबई जलमय झाल्यास त्याची जबाबदारी आयुक्तांवर असेल असा डांगोरा पिटण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने गुरुवारी नालेसफाईचा पाहणी दौरा आयोजित केला आहे. सत्ताधारी शिवसेनेला उघडे पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही नालेपाहणी दौरा, तर काँग्रेसने ब्रिटानिया उदंचन पाहणी दौऱ्याचे आयोजन करीत ‘पोलखोल’ करण्याचा इशारा दिला आहे. एकंदरीत राजकीय पक्षांचा आजचा दिवस नाल्याकाठी साजरा होण्याची चिन्हे आहेत. भाजपने मात्र मौन धारण केले आहे.
नालेसफाईच्या कामांवरून सध्या पालिकेतील वातावरण तापले आहे. नालेसफाईबाबत असमाधान व्यक्त करीत सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी पत्रकार परिषदेत आयुक्तांवर हल्ला बोल केला. त्यापाठोपाठ महापौर स्नेहल आंबेकर यांनी मुंबई जलमय झाल्यास जबाबदारी आयुक्तांवर असेल, असा इशारा आयुक्त अजोय मेहता यांना पत्राद्वारे दिला आहे. प्रभागातील नाल्यांची १० टक्केही कामे झाली नसल्याचा दावा शिवसेना नगरसेवकांकडून करण्यात आला आहे.

दोषारोप टाळण्यासाठी धावपळ
पालिकेच्या आगामी निवडणुकीत नालेसफाईचे खापर आपल्यावर फुटू नये याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाची धावपळ उडाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी नालेसफाई दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.