बीडच्या महिला हवालदाराला न्यायालयाची सूचना

लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी सुट्टी देण्यास वरिष्ठांनी नकार दिलेल्या बीड येथील महिला हवालदार ललिता साळवे (२८) हिने या मागणीसाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दाद मागावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने सोमवारी केली.

ललिता हिला लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याची सुट्टी हवी आहे. त्यासाठी तिने पोलीस महासंचालकांकडे अर्ज केला होता. मात्र तिचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यामुळे तिने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर अ‍ॅड्. एजाज नक्वी यांनी तिची ही याचिका सोमवारी सादर केली. त्या वेळी हा सेवेशी संबंधित प्रश्न असल्याने ललिता हिने ‘मॅट’मध्ये त्याबाबत दाद मागावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. परंतु जगण्याच्या अधिकाराशी संबंधित ही मागणी असल्याचा युक्तिवाद नक्वी यांच्याकडून करण्यात आला. तो मुद्दाही न्यायाधिकरणासमोर ऐकला जाईल, असे नमूद करीत न्यायालयाने तिला न्यायाधिकरणाकडे जाण्याची सूचना केली.

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानंतर ललिताने लिंगबदल चाचणी करण्याचा निर्णय घेतला. तसेच शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याची सुट्टी मान्य करण्याची विनंती पत्रव्यवहाराद्वारे वरिष्ठांकडे केली. परंतु तिला लिंगबदल शस्त्रक्रिया करता येऊ शकत नाही आणि त्यासाठी तिला सुट्टी दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करीत तिची ही विनंती अमान्य करण्यात आल्याचे बीडच्या पोलीस अधीक्षकांकडून तिला सांगितले. परंतु तिची विनंती अमान्य करणे हा आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असा दावा करीत ललिताने परवानगीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.