21 March 2019

News Flash

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगाराची मुंबई-ठाण्यातून तडीपारी

सामूहिक बलात्कार प्रकरणाच्यावेळी तो 17 वर्षांचा होता. त्याच्यासह अन्य अल्पवयीन गुन्हेगारांनाही जुलै 2014 मध्ये तीन वर्षांची शिक्षा झाली होती.

प्रातिनिधिक छायाचित्र

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार असलेल्या व आता मोकाट असलेल्या तरूणाला मुंबई व ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. केवळ अल्पवयीन असल्यामुळे कायद्याचा आधार घेत हा अल्पवयीन तरूण 2013मधल्या गाजलेल्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात किरकोळ शिक्षा भोगून बालसुधारगृहातून 2017 मध्ये बाहेर आला होता. परंतु नंतरही त्याचे वर्तन गुन्हेगारी राहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आकाश जाधव असे त्याचे नाव असून एकवीस वर्षांचा झाल्यावर दोनच महिन्यांत तो बालसुधारगृहातून सुटला होता. सामूहिक बलात्कार प्रकरणाच्यावेळी तो 17 वर्षांचा होता. त्याच्यासह अन्य अल्पवयीन गुन्हेगारांनाही जुलै 2014 मध्ये तीन वर्षांची शिक्षा बालन्यायालयानं सुनावली व त्यांची रवानगी नाशिक येथल्या सुधारगृहात केली. 2017मध्ये सुटका झाल्यानंतर आकाश सुधारला तर नाहीच उलट दंगल करणे, हत्येचा प्रयत्न, हल्ला अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये तो सहभागी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आग्रीपाडा पोलिस ठाणे व एम एन जोशी मार्ग पोलिस ठाणे येथे त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी किरकोळ वादातून त्यानं दोन भावांवर हल्ला केला होता.

पोलिस उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांनी सांगितलं की जाधवला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. त्याच्याविरोधात अनेक फौजदारी गुन्हे दाखल असून त्याच्यामध्ये सुधारणा होण्याची कोणतीही लक्षणे नाहीत असे ते म्हणाले. त्याच्याविरोधात असलेल्या सगळ्या प्रकरमांचा आम्ही अभ्यास केला आणि त्याला तडीपार करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

First Published on June 12, 2018 6:16 pm

Web Title: shakti mill gang rape accuded externed from mumbai thane for two years