मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर मेडिकल कॉम्पलिकेशन आणि इतर गोष्टींचा विचार करुन शरद पवारांवर बुधवारी करण्यात येणारी शस्त्रक्रिया मंगळवारी रात्रीच करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एएनआयशी बोलताना दिली. मंगळवारी रात्रीच पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पित्ताशयाचा खडा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. दरम्यान ब्रीच कँडीमध्ये पवारांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांचा पहिला फोटो त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट केलाय.

नक्की वाचा >> सुप्रिया सुळेंनी पहाटे साडेपाच वाजता रुग्णालयामधूनच पोस्ट केला ‘हा’ फोटो

सकाळी सव्वा दहाच्या सुमारस सुप्रिया यांनी केलेल्या या पोस्टमध्ये शरद पवार वृत्तपत्र वाचताना दिसत आहेत. “सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत,” असं या फोटोला कॅप्शन देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

 

सोमवारी पहिल्यांदाच शरद पवार यांना गॉल ब्लँडरचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी पवारांना बुधवारी रुग्णालयात दाखल करुन शस्त्रक्रिया करण्याचं ठरवण्यात आलेलं. मात्र अधिक त्रास जाणवू लागल्याने मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

नक्की वाचा >> शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी; प्रकृती स्थिर असल्याची आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

या शस्त्रक्रियेसंदर्भातील ब्रीच कँडीमधील डॉक्टर अमित मायदेव यांनीही एएनआयशी बोलताना सविस्तर माहिती दिली. “काही चाचण्या केल्यानंतर आम्ही त्यांच्यावर आजच (मंगळवारी) रात्री शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. काही कॉम्पलिकेशन्स निर्माण झाल्याने आम्ही लगेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पित्तशय काढायचे की नाही याचा निर्णय आम्ही नंतर घेणार आहोत. सध्या ते देखरेखीखाली आहेत,” असं डॉक्टर मायदेव यांनी सांगितलं आहे.

पवारांना हा त्रास जाणवू लागल्याने त्यांचे सर्व नियोजित राजकीय दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती आधीच देण्यात आलीय. पाच राज्यामधील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पवार पश्चिम बंगालसहीत इतर राज्यांमध्ये निवडणुक प्रचार दौरा करणार होते.