जागावाटपाबाबत काँग्रेसने शरद पवार यांच्यापुढे नमते घेतले असले तरी काँग्रेसचे केंद्रातील मंत्री के. व्ही. थॉमस यांनी मात्र पवार यांच्यावर थेट हल्ला चढविला आहे. पवार हे विश्वासू नाहीत, असे मत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मांडले होते याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
महागाई, धान्य निर्यात यावरून अन्न व नागरी पुरवठामंत्री थॉमस यांचा पवार यांच्याशी नेहमीच वाद होत असतो. पवार यांच्या धोरणांना थॉमस कायम विरोध करतात. केरळमधील थॉमस यांनी त्यांच्या पुस्तकात पवार यांच्याबद्दल एक प्रकरण लिहिले आहे. त्यात पवार यांच्यावर यथेच्छ टीका केली आहे. पवार यांनी सोनियांच्या पाठीत खंजीर खुपसला या प्रकरणात १९९९ मधील राजकीय घटनांचा उल्लेख केला आहे. काँग्रेस पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळावे, असा त्यांचा तेव्हा प्रयत्न होता. सोनिया पंतप्रधान झाल्यास आपले पंतप्रधानपदाचे स्वप्न साकार होणार नाही याचा अंदाज आल्यानेच पवार यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता.
१५ मे १९९९ मध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनियांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करून पवार यांनी बंडाचे निशाण रोवले होते. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पवार यांनी पुलोदचा प्रयोग केला तेव्हाही पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, असेच बोलले जायचे.
राज्यातील सरकार पाडण्याच्या प्रयत्नात पवार असल्याचा धोक्याचा इशारा नासिकराव तिरपुडे यांनी दिला होता, पण दादांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, असेही सांगण्यात येते.
मग दहा वर्षे कसे चालले, राष्ट्रवादीचा सवाल
हे केंद्रीयमंत्री थॉमस यांचे वैयक्तिक मत असू शकते. गेली १५ वर्षे महाराष्ट्रात, तर १० वर्षे केंद्रात काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत भागीदार आहेत. तसे काँग्रेसला वाटत असेलच तर गेली १० वर्षे केंद्रातील सत्तेत पवार कसे चालले, असा सवालच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.