व्यवस्थापनाच्या निर्णयाला पालकांचा विरोध

चौथीपर्यंत राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार शिकल्यानंतर आता येत्या शैक्षणिक वर्षांपासून शाळा अचानक ‘आयसीएसई’ मंडळाशी संलग्न करण्याचा निर्णय दादरच्या शारदाश्रम शाळेने  घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षांत पाचवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या निर्णयाला पालकांकडून विरोध करण्यात येत आहे.

शारदाश्रम विद्यामंदिर ही शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्न असलेली शाळा. शाळा प्रशासनाने पुढील वर्षांपासून मात्र ‘आयसीएसई’ या आंतरराष्ट्रीय मंडळाशी शाळा संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षांत पाचवीच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आयसीएसई’ने निश्चित केलेला अभ्यास करावा लागणार आहे. त्यासाठी यंदा चौथीतील विद्यार्थ्यांचा दाखला पालकांनी घ्यावा आणि पुढील वर्षी पाचवीसाठी शाळेत नव्याने प्रवेश घ्यावा, अशी सूचना शाळेने केली आहे.

गेली चार वर्षे एका पद्धतीच्या आराखडय़ानुसार अभ्यास केल्यानंतर पुढील वर्षांपासून अचानक मंडळ बदलणे योग्य नसल्याचा आक्षेप पालकांनी घेतला आहे. ‘शाळेने पालक शिक्षक संघातील काहीच सदस्यांशी चर्चा केली आणि त्यानुसार निर्णय घेतला. आम्हाला मुलांना राज्य मंडळाच्या शाळेतच शिकवायचे आहे. सध्या शाळेची पटसंख्याही खूप आहे. पालकांना विश्वासात न घेता शाळेतून दाखले काढून पुढील वर्षी शाळेत नव्याने प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून दबाव आणला जात आहे,’ असे पालकांनी सांगितले. याबाबत पालक, नगरसेवक सचिन पडवळ, युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांनी शिक्षण विभागाकडे मंगळवारी तक्रार केली. याबाबत शाळा व्यवस्थापनाचे सदस्य सुभाष जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

परवानगीपूर्वीच नावात बदल?

शाळा आयसीएसईशी संलग्न करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी आणि शिक्षण विभागाची परवानगी मिळण्यापूर्वीच शाळेने नावही बदलले असल्याचे दुर्गे यांनी सांगितले. शारदाश्रम शाळेचे नाव सध्या एस. व्ही. इंटरनॅशनल स्कूल असे करण्यात आले आहे.

खटाटोप शुल्कासाठी?

पुढील वर्षी पाचवीला नव्याने प्रवेश घेताना पालकांना वाढीव शुल्काचा भार पेलावा लागणार आहे. शाळेचे शुल्क आतापेक्षा अनेक पटींनी वाढवता यावे यासाठीच शाळेकडून आयसीएसईची संलग्नता मिळवण्यात येत आहे, असा आरोपही करण्यात येत आहे.