News Flash

एम-इंडिकेटरमुळे टॅक्सी-रिक्षा ‘शेअर’

टॅक्सी-रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आता ‘शेअरिंग’ हा नवा पर्यायही अवलंबायला सुरुवात केली आहे.

मुंबईसारख्या शहरात रेल्वेबरोबरच टॅक्सी-रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही खूप आहे. टॅक्सी-रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आता ‘शेअरिंग’ हा नवा पर्यायही अवलंबायला सुरुवात केली आहे. परंततु अनेकदा या शेअरिंगसाठीही सहप्रवासी लवकर मिळत नसल्याने ताटकळत उभे राहण्याची वेळ येत असते. आता टॅक्सी-रिक्षा शेअरिंगसाठी सहप्रवासी मिळवून देण्यासाठी ‘एम-इंडिकेटर’ हे लोकप्रिय अ‍ॅप प्रवाशांना मदत करणार आहे. रेल्वे आणि बेस्टच्या अचूक वेळापत्रकांनी प्रवास सुखमय करणाऱ्या एम-इंडिकेटरमध्ये नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या ‘शेअर’ या विकल्पामुळे आता शेअरिंगसाठी सहज सहप्रवासी मिळू शकणार आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये काही रेल्वे स्थानकांजवळ टॅक्सी-रिक्षा शेअरिंगची व्यवस्था उपलब्ध असली तरी अनेक ठिकाणी अद्याप अशी सोय नसल्याने प्रवाशांना वाहन मिळेपर्यंत खूप वेळ उभे राहावे लागते. अशा वेळी एकटय़ानेच स्वतंत्रपणे रिक्षा-टॅक्सीने प्रवास करावा लागतो. दररोज ठरावीक मार्गाने प्रवास करणाऱ्यांना मात्र रोजच स्वतंत्रपणे रिक्षा-टॅक्सीने जाणे परवडणारे नसते. तसेच अनेक ठिकाणी प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत रिक्षा-टॅक्सींची संख्या कमी आहे. त्यामुळे अशा ठिकाणी प्रवाशांना वाहनाची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. या साऱ्या कारणांनी प्रवाशांची गैरसोय मात्र होत असते. विशेषत: सकाळी व सायंकाळच्या वेळेत प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे तर वाहनासाठी ताटकळत उभे राहण्याचा अनुभव अनेक जण घेत असतात. अशा वेळी आपण जात असलेल्या मार्गावरूनच प्रवास करणारा सहप्रवासी मिळाल्यास ताटकळत उभे राहण्याची वेळ येणार नाही. सामान्य प्रवाशांना भेडसावत असलेल्या या प्रश्नावर ‘एम-इंडिकेटर’ने आता ‘शेअर’ या अनोख्या विकल्पाद्वारे उत्तर शोधले आहे. ‘एम-इंडिकेटर’ने आपल्या अ‍ॅपमध्ये ‘शेअर’ हा नवा विकल्प तयार केला असून त्याद्वारे आपण आपला सहप्रवासी सहज मिळवू शकतो. शेअर या विकल्पामुळे एकाच मार्गाने जाणाऱ्या दोन किंवा त्याहून अधिक प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे.
यामुळे मुंबईतील वाढणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यात काही प्रमाणात यश येईल आणि शेअरिंगसाठी सहज सहप्रवासी उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांच्या वेळ व पैशांमध्येही बचत होईल, असे ‘एम-इंडिकेटर’चे निर्माते सचिन टेके यांनी सांगितले. यासाठी एम-इंडिकेटरने ‘एम-इंडिकेटर स्पायडर’ ही अ‍ॅपची अकरावी आवृत्ती प्रवाशांसाठी सुरू केली आहे. यामध्ये मध्य रेल्वे व पुणे-लोणावळा लोकल गाडय़ांचे सुधारित वेळापत्रक तसेच नव्याने सुरू केलेल्या ‘शेअर’ या विकल्पाचाही समावेश करण्यात आला आहे.

‘शेअर’मधून असे मिळवा सहप्रवासी-
‘एम-इंडिकेटर’ या अ‍ॅपमधील ‘शेअर’ या विकल्पावर जाऊन आपल्याला जिथे जायचे आहे ते ठिकाण टाइप करावे. त्यानंतर प्रवाशाला त्याच्या जवळपास असलेल्या व त्याच मार्गाने जाणारा दुसरा प्रवासी नकाशावर दाखविला जाईल. त्या दुसऱ्या प्रवाशासोबत आपण मोबाइलवर संवाद साधून शकतो. या संभाषणातून आपण त्या सहप्रवाशाशी वाहन व प्रवासाविषयी निर्णय घेऊन त्याच्याबरोबर टॅक्सी किंवा रिक्षा बोलावून पुढील प्रवास एकत्र करू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2016 4:07 am

Web Title: share taxi rickshaw information on m indicator
Next Stories
1 शेपटीवाल्या प्राण्यांची मुंबईत भरली सभा !
2 राजावाडी रुग्णालयात काम बंद आंदोलन
3 दुचाकी रुग्णवाहिकेला पालिकेचा नकार
Just Now!
X