दिल्लीच्या ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’तील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याच्या वक्तव्यावरून उद्भवलेल्या राजकीय वादळाचे परखड विश्लेषण करणाऱ्या ‘दे रे कान्हा..’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.
एका विद्यार्थी संघटनेच्या नेत्याच्या वक्तव्यावर विधिनिषेधशून्य राजकारण करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या बालिशपणावर ७ मार्चला छापून आलेल्या अग्रलेखात सडेतोड टीका करण्यात आली होती. ज्येष्ठ राजकारण्यांनी हे प्रकरण हाताळताना जी विवेकशून्यता दाखविली त्यावर या अग्रलेखात नेमकेपणाने बोट ठेवण्यात आले होते. या आठवडय़ाच्या ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये विद्यार्थ्यांना याच विषयावर आपली भूमिका मांडायची आहे.
तत्पूर्वी याच विषयावर शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विषयाचे अभ्यासक प्रा. प्रकाश पवार आणि पुण्याच्या ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चे प्रा. परिमल माया सुधाकर यांना ‘लोकसत्ता’ने बोलते केले आहे. या दोघांनीही या विषयाचे आणखी कंगोरे उलगडण्यास मदत केली आहे. त्यांच्या मांडणीचा विद्यार्थ्यांना आपली भूमिका अधिक सुस्पष्टपणे मांडण्यास उपयोग होईल.
वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पर्धेचा हा चौथा लेख आहे. आर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद आदी विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.
या लेखन स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे.

लक्षात ठेवावे असे..
* प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते.
* मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत.
* indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
* ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.
* नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना आपली भूमीका मांडता येते.
* किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पर्धेसाठी विचार केला जाईल.
सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.