एल्गार परिषदेच्या ३० जानेवारीला पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात हिंदू धर्मबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानी याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
यंदा ३० जानेवारीला एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात भाषण करताना शर्जिलने हिंदू धर्म, भारतीय न्यायव्यवस्था आणि संसदेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी प्रदीप गावडे नावाच्या व्यक्तीने तक्रार केल्यानंतर २ फेब्रुवारीला स्वारगेट पोलिसांनी शर्जिलविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शर्जिलने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तसेच याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून पोलिसांना मज्जाव करण्याची मागणीही केली आहे.
आपल्या वक्तव्यानंतर कोणत्याही प्रकराची हिंसा झालेली नाही किंवा सामाजिक सलोखा बिघडलेला नाही. त्यामुळे आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा हा आधारहीन आहे, असा दावा शर्जिलने तो रद्द करण्याची मागणी करताना केला आहे. आपल्या भाषणात आपण केवळ आजच्या सामाजिक बांधणीतील अडचणीवर बोट ठेवून त्यावरील तोडगा सांगण्याचा प्रयत्न केला होता. याउलट संपूर्ण भाषणात आपण कोणताही धर्म, जात किंवा समुदायाबाबत द्वेषभावना न ठेवता प्रत्येकाने समाजात निर्माण झालेल्या वाईट इच्छाशक्तीविरोधात लढण्याचे आवाहन केले होते, असेही शर्जिलने याचिकेत म्हटले आहे. शर्जिलच्या याचिकेवर पुढील आठवडय़ात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 6, 2021 12:23 am