बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातल्या तिन्ही आरोपींना ५ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्यामवर राय यांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने पुरेसे पोलीस बळ उपलब्ध नसल्याने त्यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर न करता व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयाने कोठडीत १४ दिवसांची वाढ करत ५ ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
त्या हाडांचे अवशेष जुळले नाही
तीन वर्षांपूर्वी पेणच्या जंगलात सापडलेल्या मानवी हाडांचे नमुने आणि आता सापडलेले हाडांचे नमुने जुळत नसल्याचा अहवाल न्यायवैद्यक तज्ञांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. नायर रुग्णालयाच्या तज्ञांनी खार पोलिसांना दिलेल्या २६ पानी अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. २०१२ साली पेणच्या जंगलात सापडलेले हाडांचे अवशेष जेजे रुग्णालयात ठेवण्यात आले होते. शीना बोरा हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर खार पोलिसांनी त्या जंगलातून शीनाची कवटी आणि काही हाडे गोळा केली होती. हे दोन्ही अवशेष एकमेकांशी जुळत नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.