औरंगाबादच्या नामांतराच्या विषयावर शिवसेना व काँग्रेसने घेतलेल्या भूमिकांवर विधानसभा विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी आज खास शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. “ही सर्व नाटक कंपनी आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे शिवसेना व काँग्रेस ठरवून हे करत आहे. शिवसेनेने आता औरंगाबादचं संभाजीनगर करा असं म्हणायचं, म्हणजे त्यांना असं वाटतं त्यांचे मतदार खुश होतील. काँग्रेसने ते करू नका असं म्हणायचं म्हणजे त्यांना वाटतं त्यांचे मतदार खुश होतील. यावरून हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की, निवडणुका आल्यामुळे ही नुरा कुस्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. दोन्ही पक्षांना याबाबत कुठलेही गांभीर्य नाही. मला असं वाटतं आहे की हे केवळ एक नाटक सुरू आहे.” असं फडणवीस पत्रकारपरिषदेत म्हणाले.

औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती’- फडणवीस

तसेच, “मी जेव्हा मुख्यमंत्री होतो. औरंगाबादच्या रस्त्यासाठी निधी दिला पण महापालिकेने तो निधी वेळेत खर्च केला नाही. मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला आणखी १०० कोटी देतो परंतु अगोदर हा निधी वापरा. परंतु अनेक दिवस ते कामाची ऑर्डर देखील काढू शकले नाहीत. १६०० कोटी रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी दिले होते. इतक्या दिवसानंतर आता त्याची कामाची ऑर्डर निघाली आहे. हे काम आतापर्यतं कितीतरी पुढं जायला हवं होतं. त्यामुळे औरंगाबादमध्ये इतके वर्ष सत्ता चालवून देखील, कुठलही महत्वाचं कार्य करता न आल्याने आता अशाप्रकारची भाषा सुरू आहे. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवूनच हे सर्व सुरू आहे.” असं म्हणत यावेळी फडणवीस यांनी  शिवसेनेवर निशाणा साधला.

औरंगाबादच्या नामांतरला काँग्रेसचा विरोध, महाविकास आघाडीत ठिणगी?

“निवडणुकीच्या निमित्त का होईना, शिवसेनेला गुजराती समाजाची आठवण झाली, ही चागंली गोष्ट आहे. आता शिवसेनेला अजान स्पर्धा आठवायला लागली आहे.” असा टोला देखील फडणवीस यांनी शिवसेनेला यावेळी लगावला.