आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पराभव करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची शिवसेना-भाजपशी वैचारिक नव्हे तर राजकीय युती असल्याची भूमिका मंगळवारी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मांडण्यात आली. शिवसेनेचे हिंदूत्व त्यांच्याजवळ राहील, परंतु महागाई, भ्रष्टाचार व दलितांवरील अत्याचाराच्या प्रश्नावर महायुती मजबूत करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मंगळवारी वाशी येथे पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला आमदार सुमंतराव गायकवाड, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, गौतम सोनावणे, तानसेन ननावरे, भूपेश थुलकर, राजा सरवदे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अलीकडेच शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेना हिंदूुत्वाची भूमिका सोडणार नाही, अशी गर्जना शिवसेने केली. आठवले यांनी सेनेच्या हिंदूुत्वाला आरपीआयचा आक्षेप नाही, असे विधान केले आणि त्यानंतर हिंदूुत्वामुळे सत्ता मिळणे अवघड आहे, अशीही प्रतिक्रिया व्यक्त केली.
पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीतही  प्रामुख्याने या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती अर्जुन डांगळे यांनी दिली. आरपीआयची शिवसेनेशी वैचारिक नव्हे राजकीय युती आहे, त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावरुन गोंधळून जाण्याचे कारण नाही, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.