04 August 2020

News Flash

जनता मतपेटीतून उत्तर देईल, पालघरचेही गोरखपूर होईल; शिवसेनेला विश्वास

भाजपने प्रामाणिकता व परंपरेचे थडगे बांधून त्या थडग्यावर काँग्रेसचे अफझलखान राजेंद्र गावीत यांना पहारेकरी म्हणून बसवले आहे.

पालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर करून ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा वापर करत असल्याचा आरोप करत गोरखपूर, फुलपूर पोटनिवडणुकीत जे घडले तेच पालघर येथे आणि गोंदियात घडेल, असा आशावादही व्यक्त केला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल फडणवीस बोलायला तयार नाहीत. आता जनताच त्यांना मतपेटीतून बोलून दाखवतील, असा इशाराही दिला.

देशात गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा झटका बसला. आता महाराष्ट्रातही वेगळा निकाल लागणार नाही. शिवरायांचे राज्यदेखील परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकेल. फडणवीसांचा पोलीस-महसूल यंत्रणेचा वापर करत निवडणूक लढवण्याचा उद्योग राज्याच्या भविष्यासाठी चिंताजनक असल्याची भीती सेनेने आपल्या ‘सामना’ या मुखपत्रातून व्यक्त केली.

राजकारणातले गजकर्ण खाजवत बसायचे व जमेल तसा आनंद घ्यायचा या भोगी वृत्तीचा स्वीकार भाजपाने केल्याची जहरी टीका शिवसेनेने केली.

जाणून घेऊयात काय म्हटले शिवसेनेने..

– पालघरची पोटनिवडणूक आम्ही स्वतंत्रपणे लढत आहोत. ही लढाई स्वाभिमानाची व निष्ठेची आहे. पालघरात भारतीय जनता पक्षाने असा प्रचार चालवला आहे की ‘एक मत प्रामाणिकतेला; पालघर भाजपच्या परंपरेला’. मात्र प्रत्यक्षात भाजपने प्रामाणिकता व परंपरेचे थडगे बांधून त्या थडग्यावर काँग्रेसचे अफझलखान राजेंद्र गावीत यांना पहारेकरी म्हणून बसवले आहे.

– दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांनी ठाणे-पालघर जिह्याच्या आदिवासी पट्ट्य़ात एकांड्य़ा शिलेदाराप्रमाणे हिंदुत्वाचा प्रचार केला. अशा वनगांचे निधन झाले व भाजपने त्यांच्या कुटुंबीयांना टांग मारली. त्याच वनगांच्या चिरंजीवांनी म्हणजे श्रीनिवास हे आता पालघरात हाती धनुष्यबाण घेऊन लढत आहेत.

– संपूर्ण पालघरात तुम्हाला निवडणुका लढण्यासाठी एकही भाजपाई, संघ विचाराचा कार्यकर्ता मिळू नये? अट्टल काँग्रेसवाले गावीत यांना एका रात्रीत भाजपवाले बनवून चिंतामण वनगांची परंपरा पुढे नेणे म्हणजे समस्त संघ स्वयंसेवकांचा अपमान आहे.

– भाजप एका पिढीस कसे भ्रष्ट व दारूडे बनवत आहे ते पालघरला जाऊन मोदी यांनी प्रथम पाहावे. या भागात पैसा आणि दारूचा अमाप वापर केला गेला व मंत्री, आमदार त्या वाटपात सहभागी झाले. मुख्यमंत्री वसई-विरारच्या कथित दहशतवादावर बोलले, पण ज्यांच्याविषयी बोलले ते भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून विधानसभेत भाजपच्या मांडीवर बसले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2018 10:12 am

Web Title: shiv sena chief uddhav thackeray slams on bjp cm devendra fadnavis palghar by election 2018
टॅग Bjp,Shiv Sena
Next Stories
1 …म्हणून अंधेरीतल्या हॉटेलमध्ये जोडप्याला नाकारली रुम
2 पालघर पोटनिवडणूक: इव्हीएम बंद पाडून भाजपाचा रडीचा डाव सुरू, हितेंद्र ठाकूर यांचा आरोप
3 पोटनिवडणूक : भंडारा-गोंदिया मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ४०.३७ टक्के मतदान
Just Now!
X