परिवहन विभागाचा तोटा काही अंशी कमी करण्यासाठी ५२ मार्ग बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने मागे घेतला आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवत बेस्ट भवन येथे थेट बेस्ट महाव्यवस्थापकांना घेराव घातला. त्यानंतर हे ५२ बसमार्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय बेस्टने घेतला. पुढील तीन महिने या ५२ मार्गाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर पुन्हा या मार्गाबाबत निर्णय होणार आहे.

बेस्टने गेल्या आठवडय़ात ५२ बसमार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हे मार्ग सर्वाधिक तोटय़ात चालणारे असल्याने ते बंद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. बेस्ट समितीमध्ये या धोरणाला विरोध होऊनही प्रशासनाने हा निर्णय कायम ठेवला. विशेष म्हणजे या ५२ पैकी बहुतांश बसमार्ग हे शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागांतील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यातच पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून याविरोधात शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. महापौर स्नेहल आंबेकर यांनीही बेस्ट महाव्यवस्थापकांना पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती.

पुढील तीन-चार महिने या मार्गाना प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळतो, याचा अभ्यास केला जाईल. पुरेसा प्रतिसाद नसल्यास हे मार्ग बंद करण्यात येतील.

– जगदीश पाटील, महाव्यवस्थापक