मागील तीन वर्षांत या सरकारने फक्त घोषणांचा पाऊस पाडला आणि या पावसात शेतकऱ्यांच्या चुली विझून गेली, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. काँग्रेसच्या सरकारने लक्ष न दिल्यानेच या शेतकऱ्यांनी आपल्याला सत्ता दिली आहे. पण आपणही असेच वागत असू तर ते आपल्याला घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. हे शेतकरी कोणत्या झेंड्याखाली एकत्र आलेत, हे आम्हाला पाहायचं नाही. या शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिलोय, त्यामुळे ते लाल झेंड्याखाली एकत्र आलेत म्हणून आमच्यावर टीका करू नका. आम्ही सत्तेत असतानाही सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या हितासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.

खासदार राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, या सरकारमध्ये आम्ही असलो तरी देण्याची सर्व खाती त्यांच्याकडे आहेत. राज्य सरकारमध्येही तीच परिस्थिती आणि केंद्र सरकारमध्येही तसेच आहे. त्यामुळे आम्ही सरकारमध्ये असलो तरी यावर निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, रविवारी आंदोलकांनी मुंबईत प्रवेश केल्यानंतर विद्यार्थी सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आपण इथे आलो असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना नेहमी तत्पर असेल, अशी ग्वाही देत या लाँग मार्चला त्यांनी पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांनीही या आंदोलनाला भेट दिली होती.