11 December 2017

News Flash

महाराष्ट्राला अंधारात ढकलणाऱ्यांनो आता तरी ‘दिवे’ लावा- शिवसेना

प्रत्येक आघाडीवर राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेचे वस्त्रहरण

मुंबई | Updated: October 7, 2017 10:35 AM

Shivsena : विकासापासून ते ‘अच्छे दिन’पर्यंत, ‘मेक इन इंडिया’पासून ते महागाईपर्यंत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून महाराष्ट्राला अंधारात लोटणाऱ्या लोडशेडिंगपर्यंत प्रत्येक आघाडीवर राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेचे वस्त्रहरण होत असल्याचेही या अग्रलेखात म्हटले आहे.

राज्यात सुरू असलेल्या भारनियमनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपला चांगलेच फैलावर घेतले आहे. काळोखात बुडालेला महाराष्ट्र पाहता ते गेले आणि हे आले, पण काय बदलले? असा प्रश्न जनतेला पडू लागला आहे. ‘विकास…विकास’ म्हणून खूप ऊर बडवला, पण तो तर कुठेच दिसत नाही. म्हणून लोडशेडिंगचा अंधार केला जात आहे काय, असा सवाल लोक राज्यकर्त्यांना विचारत आहेत. महाराष्ट्राला अंधारात ढकलणाऱयांनो, कोळसा उगाळणे थांबवा आणि आता तरी ‘दिवे’ लावा, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.

पूर्वाश्रमीची सगळीच सरकारे आणि राज्यकर्ते तद्दन नालायक होते. राज्य कारभार कशाशी खातात हेच त्यांना ठाऊक नव्हते. आता आम्हीच काय तो या महाराष्ट्राचा आणि देशाचा उद्धार करू, अशा गमजा मारणाऱ्या मंडळींचे बुरखे दररोजच टराटरा फाटत आहेत. विकासापासून ते ‘अच्छे दिन’पर्यंत, ‘मेक इन इंडिया’पासून ते महागाईपर्यंत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून महाराष्ट्राला अंधारात लोटणाऱ्या लोडशेडिंगपर्यंत प्रत्येक आघाडीवर राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेचे वस्त्रहरण होत असल्याचेही या अग्रलेखात म्हटले आहे.

कोळशाचा नियमित पुरवठा होत नसल्यामुळे वीजनिर्मितीत अडथळे येत असल्याचा दावा सरकारी वीज कंपनीकडून करण्यात आला होता. मात्र, वीजनिर्मितीसाठी कोळसा आवश्यक आहे हे जर तुम्हाला ठाऊक आहे तर कोळशाचा पुरेसा साठा करून का नाही ठेवला? टंचाई-टंचाई म्हणून तोच तो कोळसा किती दिवस उगाळत बसणार? पुन्हा कितीही उगाळला तरी शेवटी कोळसा तो कोळसाच! त्यामुळे तेच ते रडगाणे जनतेला ऐकवण्यापेक्षा एवढ्या दिवसांत कोळशाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न का नाही केलेत? केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे तुम्हीच सत्तेवर आहात. मग अडचण कसली? कोळशाचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात तुम्ही चुकला असाल, कमी पडला असाल तर तसे जाहीर करून लोडशेडिंगचे चटके सहन करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा, अशी मागणी शिवसेनेने केली.

First Published on October 7, 2017 10:35 am

Web Title: shiv sena take a dig at bjp over load shedding in maharashtra