..अन्यथा पक्षांतर करूनही नगरसेवक तांत्रिकदृष्टय़ा मूळ पक्षातच
मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस लागली असून, निवडून येण्याकरिता काही नगरसेवकांनी अन्य पर्याय स्वीकारले आहेत. या नगरसेवकांनी पक्षांतर केले तरी पुढील निवडणुकीपर्यंत तांत्रिकदृष्टय़ा ते मूळ पक्षाचे नगरसेवक राहणार आहेत. पक्षाने जारी केलेला पक्षादेश (व्हिप) झुगारला तरच पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
अलीकडे दररोज नगरसेवकांचे आयाराम-गयाराम सुरू झाले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत हमखास निवडून येतील अशा नगरसेवकांना गळाला लावले जात आहे. मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पक्षांतराचा फटका बसला आहे. पक्षांतर केले तरीही नगरसेवक तांत्रिकदृष्टय़ा त्यांच्या मूळ पक्षाचे सदस्य राहतील. अन्य पक्षात प्रवेश केला तरी त्यांचे नगरसेवकपद कायम राहू शकते. पण एखाद्या विषयावर पक्षादेश (व्हिप) लागू झाल्यास या नगरसेवकांवर तो बंधनकारक राहील. पक्षादेश झुगारल्यास नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. नारायण राणे यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये गेलेले शिवसेनेचे पाच आमदार तांत्रिकदृष्टय़ा शिवसेनेचे सदस्य होते. राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान होते. परिणामी राणे यांच्याबरोबर राहूनही पक्षादेशामुळे त्यांना शिवसेनेला मतदान करावे लागले होते.
एखादा नगरसेवक जोपर्यंत स्वत:हून मी पक्षांतर केले असे जाहीर करीत नाही वा पक्षादेश झुगारत नाही तोपर्यंत वेगळ्या पक्षात गेला तरीही त्याचे नगरसेवकपद कायम राहू शकते, असे सांगण्यात आले. अन्य पक्षात प्रवेश केल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले तरीही त्याचा पक्षांतर केले म्हणून पुरावा ग्राह्य़ मानला जात नाही. परिणामी तांत्रिकदृष्टय़ा अन्य पक्षात, पण नगरसेवक म्हणून मुदत संपेपर्यंत मूळ पक्षाचा आदेश मानावा लागणार आहे. पक्षादेश मोडला तरच कायदेशीरदृष्टय़ा अपात्रतेची कारवाई होऊ शकते.