राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा पराक्रम उघड

रसिका मुळ्ये, मुंबई</strong>

शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवायचे ठरविले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत जनमनांतील अस्मिता तेवत ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा पदोपदी गजर होतो, मात्र महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आला आहे.

राज्यातील शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृती जपत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने ‘स्थानिक’ भाषा माध्यमातील शाळांना शिक्षण विभागाने ‘आंतरराष्ट्रीय’ असे बिरूद चिकटवले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळही सुरू केले. गेल्यावर्षी पुस्तकांविनाच चालणाऱ्या या शाळांसाठी यंदा पहिली ते चौथीची पुस्तके ऑगस्ट महिन्यात छापण्यात आली. त्यातून ही बाब समोर आली आहे.

चौथीच्या वर्गाला शिवाजी महाराजांचा इतिहास हा गेली अनेक वर्षे  शिकवण्यात येतो. सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री असताना १९९१ मध्ये चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकांत काही बदल करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या वादंगानंतर चौथीच्या पुस्तकांतील शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याबाबत विधिमंडळात ठराव झाला होता. त्यानंतर सरकार बदलले, अभ्यासक्रम बदलले तरी चौथीचे इतिहासाचे पुस्तक आणि शिवाजी महाराज हे समीकरण कायम राहिले. २०१० मध्ये अभ्यासक्रमाची पुनर्रचना करतानाही चौथीचे इतिहासाचे पुस्तक शिवाजी महाराजांवरच ठेवण्यात आले. पहिल्यांदा १९७० मध्ये इतिहासाचा अभ्यासक्रम निश्चित झाल्यानंतर त्याच्या मांडणीत कालानुरूप काही बदल झाले. मात्र चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाचा मूळ गाभा तोच ठेवण्यात आला. आता आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ याला अपवाद ठरत असल्याचे दिसत आहे.

याबाबत शिक्षण आयुक्त आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे प्रभारी संचालक विशाल सोळंकी आणि सचिव विकास गरड यांनी बोलण्यास नकार दिला.

पुस्तकात काय?

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या वेगळ्या पैलूंची ओळख तर सोडाच पण आतापर्यंत राज्यमंडळाच्या पुस्तकांत गोष्टीरुपात मांडण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पराक्रम, लढाया याचाही समावेश केलेला दिसत नाही. केवळ  भारतीय लोक या घटकांत शिवाजी महाराज, रामदास स्वामी, एकलव्य, लाल बहादूर शास्त्री आणि हनुमान यांची त्रोटक माहिती आहे.

झाले काय?

राज्यमंडळाच्या शाळांमध्ये गेली पन्नासहून अधिक वर्षे चौथीच्या पाठय़पुस्तकांतील अविभाज्य भाग असलेला शिवाजी महाराजांचा इतिहास आंतराराष्ट्रीय मंडळाच्या पाठय़पुस्तकांतून वगळण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या तत्वांचे राज्य निर्माण करण्याचा प्रचार सध्या सर्वपक्षीय नेत्यांकडून सुरू आहे. तरी नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने फारशी तसदी घेतलेली दिसत नाही.