08 July 2020

News Flash

शिवजयंती विशेष: “महाराष्ट्राच्या मालकाचं नाव एकेरी घेणं बंद करा”

मराठमोळ्या तरुणाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना आगळीवेगळं अभिवादन

शिवजयंती विशेष पोस्ट

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. आज देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर शिवजयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. महाजारांचे जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केलं. सर्वच सोशल नेटवर्किंग साईटवरही शिवजयंतीनिमित्त अनेकांनी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत महाराजांबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. ट्विटवरही #ShivajiMaharaj, #ShivJayanti, #छत्रपतीशिवाजीमहाराज, #शिवजयंती, #ShivajiMaharajJayanti, #Shivaji हे हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहेत. मात्र या सर्वांमध्ये एका मराठमोळ्या तरुणाची शिवाजी महाराजांना अभिवादन करणारी एक पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

कोण आहे हा तरुण?

नीलराज कदम असं या मराठमोळ्या मुलाचं नाव आहे. एक फेब्रुवारीपासून नीलराज मुंबईमधील वेगवेगळ्या ठिकाणी मजेदार वाक्य लिहिलेले साईनबोर्ड हातात घेऊन गर्दीच्या ठिकाणी उभा राहतो. मागील १९ दिवसांमध्ये सोशल नेटवर्किंगवर सुरु असलेल्या त्याच्या या उपक्रमाला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्याने आतापर्यंत ९ फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये सोमवारी सकाळच्या मिटिंग्ज बेकायदा ठरवल्या पाहिजेत, काळा घोडा फेस्टिव्हल कलेशी संबंधित आहे सेल्फीशी नाही असे त्याच्या काही पोस्ट चांगल्याच गाजल्या. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर signboard_wala या हॅण्डलने त्याचे अकाऊंट सुरु केलं आहे.

पाहा फोटोगॅलरी  >> मुंबई गाजवणाऱ्या signboard_wala ने पोस्ट केलेले सर्व फोटो

शिवजयंतीनिमत्त खास पोस्ट…

नीलराजने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला एक पोस्ट आपल्या signboard_wala या हॅण्डलवरुन केली आहे. या साईनबोर्डवर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर साईनबोर्ड घेऊन उभा असलेला दिसतो. या साईनबोर्डच्या दोन्ही बाजूला मजकूर लिहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांना नीलराजने आपल्या या पोस्टमधून फटकारले आहे. “महाराष्ट्राच्या मालकाचं नाव एकेरी घेणं बंद करा,” असं साईनबोर्डच्या एका बाजूला लिहिलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला, “हे सांगावं लागतं म्हणजे दुर्देवचं!” असा टोमणा महाराजांचे एकेरी नाव घेणाऱ्यांना नीलराजने लगावला आहे. तसेच त्याने या फोटोला एक खास कॅप्शनही दिली आहे. “ज्यांच्या विना झाली असती साऱ्या हिंदुस्थानची माती, असे होते आमचे महाराज शिव छत्रपती,” अशी कॅप्शन देत महाराजांचा उल्लेख आदराने करण्याची सुरुवात स्वत:पासूनच करा असा सल्ला नीलराजने नेटकऱ्यांना दिला आहे.

सोशल मिडियावर नीलराजने केलेली पोस्ट शिवजयंतीनिमित्त चांगलीच चर्चेत आहे. फेसबुकवर नीलराजच्या पोस्टला काही तासांमध्ये ९०० हून अधिक जणांनी शेअर केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 5:21 pm

Web Title: shivjayanti 2020 respect chatrapati shivaji maharaj post by signboard wala nilraj kadam goes viral scsg 91
Next Stories
1 Reliance Jio : एक ट्रिक वापरा आणि 199 च्या प्लॅनमध्ये 10 पट अधिक डेटा मिळवा
2 रॉकेट हल्ला होऊनही अभेद्य राहणारी ट्रम्प यांची ही The Beast कार आहे कशी?
3 Video: बेल्जियमचा शिवप्रेमी.. २ महिन्यात २०० गडकिल्ल्यांना दिली भेट
Just Now!
X