नोटाबंदीच्या निर्णयानंतर होणाऱ्या त्रासामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी आले असताना तुमच्या भावूक होण्याला अर्थ काय, असा सवाल उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. इतका मोठा निर्णय घेताना ज्यांनी विश्वासाने निवडून दिले त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.

‘१२५ कोटी जनतेचा निर्णय एक व्यक्ती घेते. केंद्रातील सरकार लोकांना आपले वाटत नाही. सध्या देशातील सर्व प्रश्न संपले आहेत. फक्त नोटा बदलण्याचे काम राहिले आहे. नोटा बदलण्यासाठी लोकांना बँकांसमोरील रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. लोकांना स्वत:च्या कष्टाचा पैसा बँकेतून काढता येणे कठीण झाले आहे. लोकांच्या डोळ्यात पाणी आले असताना तुमच्या भावूक होण्याला अर्थ काय ?,’ असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

‘लोकांनी मोठ्या विश्वासाने तुम्हाला निवडून दिले. मात्र तुम्ही त्याच लोकांना विश्वासात न घेता नोटाबंदीचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयाचे अतिशय गंभीर परिणाम होणार आहे, असा इशारा देशासह परदेशातील अर्थतज्ञ देत आहेत. लोकांना त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त होत आहे, असे वाटते आहे,’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली.

विरोधकांनी नोटाबंदीच्या निर्णयावरुन संसद दणाणून सोडली आहे. पंतप्रधानांनी नोटाबंदीच्या चर्चेत सहभागी व्हावे, नोटाबंदीवरुन मतदान घेतले जावे, अशी विरोधकांची मागणी आहे. यावरुनही उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली. ‘मतदान घेऊन काय होणार ? ब्रिटनच्या पंतप्रधानांनी ब्रेक्झिटच्यावेळी जनमत घेतले होते. जनतेने ब्रेक्झिटला पाठिंबा दिल्यावर डेव्हिड कॅमेरुन पंतप्रधान पदावरुन पायउतार झाले. तसे आपल्याकडे होणार का ?’ असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला.

शिवसेना खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीबद्दलही उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. ‘जिल्हा आणि सहकारी बँकांना जुन्या नोटा बदलून घेण्याचे अधिकार नाहीत. त्यावर शिवसेनेच्या खासदारांनी मोदींची भेट घेतली. यानंतर नाबार्डकडून २१ हजार कोटींचा निधी जिल्हा बँकांना देण्यात आला. मात्र त्याचा आणि नोटाबदली करण्याचा काहीही संबंध नाही, हे माझ्या लक्षात आले आहे. दरवर्षी नाबार्डकडून जिल्हा बँकांना अशा प्रकारे रक्कम दिली जाते. यावेळी त्याचा गाजावाजा करुन सर्वकाही आलबेल असल्याचा आभास निर्माण करण्यात आला,’ असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर टीका केली.

‘शेतकरी स्वत:चेच पैसे बँकेतून काढू शकत नाही. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळू शकत नाहीत. शेतकऱ्यांकडे काळा पैसा आहे का ?. रांगेत उभे राहून शेतकरी देशभक्त होतील का ? सरकार लोकांकडून खंडणी घेतं आहे का ? जगात असा कोणता देश आहे जो आपल्या नागरिकांकडून खंडणी घेतो ? तुम्ही काळ्या मनाने काळा पैसा शोधत आहात का ?,’ असे सवाल उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला विचारले आहेत.