News Flash

संजय राऊत म्हणतात, “…म्हणून सचिन वाझेंना लक्ष्य केलं जातंय!”

संजय राऊत यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं कौतुक करतानाच विरोधकांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत आणि सचिन वाझे

आधी अंबानींच्या अँटिलिया घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार आणि जिलेटिनच्या कांड्या, त्यानंतर कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू आणि आता सचिन वाझेंवर झालेले आरोप आणि त्यांची बदली यावरून राज्याच्या राजकारणात आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. मंगळवारी विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून मोठा गोंधळ घातला. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांना सचिन वाझेंची बदली केल्याचं जाहीर करावं लागलं. अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, सचिन वाझे यांचं देखील कौतुक केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, “सचिन वाझे हे निष्णात तपास अधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी दोन प्रमुख प्रकरणांना हात घातला. अन्वय नाईक हे दडपलेलं प्रकरण वाझेंनी उघडकीस आणलं होतं. संबंधित व्हाईट कॉलर आरोपींना अटक केली. हा देखील अन्वय नाईक कुटुंबीयांना न्यायच झालाय. त्याबद्दल विरोधी पक्ष बोलत नाहीत. टीआरपी घोटाळ्यातही त्यांनी कारवाई केली. सचिन वाझेंना लक्ष्य केलं जात आहे. या दोन प्रकरणात त्यांनी आरोपी तुरुंगात टाकले, हा मुद्दा त्यामागे असू शकतो”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“विरोधकांना राजकारण नीट कळलं नाही”

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील खोचक शब्दांमध्ये टीका केली. “फक्त राजीनामा, बदली हेच विरोधी पक्षांचं काम आहे का? लोकशाहीत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने एकप्रकारे सरकारच चालवायचं असतं. तुम्हाला जर राजीनामा किंवा बदलीमध्येच समाधान मानायचं असेल, तर महाराष्ट्राचं राजकारण विरोधी पक्षांना नीट कळलेलं नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

सचिन वाझेंबद्दल ठाकरे सरकारकडून मोठा निर्णय; गृहमंत्र्यांनी केली घोषणा

“जिलेटिनच्या कांड्या सापडल्यावरच गांभीर्य कळणार?”

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून संजय राऊत यांनी केंद्रात सत्तेत असलेल्या आणि राज्यात विरोधात असलेल्या भाजपावर निशाणा साधला. “अंबानी उद्योगपती असतील, पण सामान्य माणसाच्या जीवाला देखील तेवढीच किंमत आहे. अन्वय नाईक, मोहन डेलकर यांच्या जीवाला किंमत नव्हती का? रोज गाजीपुरच्या सीमेवर १० ते १२ शेतकरी मरत आहेत. तिथेही कुणी स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या तरच गांभीर्य कळणार आहे का?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

दाऊद, शिवसेना ते अँटिलिया! नक्की कोण आहेत सचिन वाझे?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 3:06 pm

Web Title: shivsena mp sanjay raut on sachin vaze transfer devendra fadnavis allegations pmw 88
Next Stories
1 अन्वय नाईक प्रकरणावरून फडणवीसांचा संताप; थेट गृहमंत्र्यांवर दाखल केला हक्कभंग!
2 “मला काही माहिती पोलिसांसोबत शेअर करायची आहे,” गँगस्टर रवी पुजारीने कोर्टात सांगताच न्यायाधीशांनी…
3 मुंबईत पुन्हा लॉकडाउन? पालिका आयुक्तांनी दिलं उत्तर
Just Now!
X