लग्नाला नकार दिल्याने कुटुंबातील तीन जणींचे खून त्याने केले होते. याच कुटुंबातील चौथ्या व्यक्तीची हत्या करण्याचा कट त्याने आखला होता. मात्र या कटासाठी त्याने केलेली चूक त्याला महागात पडली.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे राहणारा अशोक धोंडीराम ढवळे हा व्यवसायाच्या निमित्ताने पेण तालुक्यातील शेडाशी गावात येथे वास्तव्याला आला होता. खोपोली मार्गावरील एका कंपनीत तो नोकरी करत होता. याच काळात गावातील मनीषा सावंत हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. मनीषाच्या आईला आणि गावातील लोकांना याची कुणकुण लागली. त्यांनी विरोध केल्यामुळे अशोकला नोकरी आणि शेडाशी गाव सोडून आपल्या गावी परतावे लागले.

गाव सोडले असले तरी त्याने मनीषाच्या आईकडे लग्नाचा तगादा लावला होता. मुलीच्या प्रेमापोटी आई लीलाबाई सावंत यांनी एकदा अशोकला भेटण्याचा आणि त्याचे घरदार पाहण्याचा निर्णय घेतला. खेड येथे त्या अशोकचे घर पाहण्यासाठी गेल्या. यावेळी अशोक अतिशय दुर्गम भागात राहत असून मुलीचे हाल होतील, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अशोकला आपली मुलगी देण्यास नकार दिला.

आधीच नोकरीवर पाणी सोडावे लागल्याने अशोक नाराज होता. त्यातच लीलाबाईंनी त्याच्या लग्नालाही नकार दिल्याने तो संतापला व रागाच्या भरात त्याने लीलाबाई यांचा खून केला व मृतदेह लगतच्या जंगलात फेकून दिला. अशोकला भेटायला गेलेली आई दोन दिवस परत आली नाही म्हणून मनीषाने अशोकला फोन केला. त्याने तिला खेड येथे बोलावून घेतले. १२ वर्षांच्या पूनम या बहिणीला घेऊन मनीषा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खोपी येथे दाखल झाली. यावेळी अशोकने लीलाबाई यांचा खून केल्याचे मनीषाला सांगितले. मनीषाने आई कुठे आहे, याबाबत तगादा लावला. तेव्हा आईचा जंगलात टाकलेला मृतदेह त्याने तिला दाखवला. आईचा मृतदेह पाहिल्यावर घाबरलेल्या मनीषा आणि पूनम हिने आरडाओरडा सुरू  केला. तसेच पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी तसे करण्यापूर्वीच अशोकने आपला मित्र अविनाश तुकाराम भोसले याच्या मदतीने मनीषा आणि पूनम यांची हत्या केली व त्यांचे मृतदेह एका दरीत फेकून दिले. लीलाबाई, पूनम आणि मनीषा या तिघीही बेपत्ता झाल्याने लीलाबाई यांची ठाण्यातील दिवा परिसरात राहणारी विवाहित मुलगी दिपाली चिंतेत सापडली व तिने पेण गाठले. तेथे तिने सर्वप्रथम पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या आई व बहिणींच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने तपासही सुरू केला.

इकडे तीन खुनांनंतरही अशोकच्या डोक्यातील क्रोधाग्नी शांत झाला नव्हता. त्याने दिपालीलाही संपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच त्याने लीलाबाई यांचा मोबाइल वापरून दिपाली हिला फोन केला. ‘तुझी आई आजारी आहे. तिला उपचाराची गरज आहे. घरातील दागिने व पैसे घेऊन तातडीने खेडला ये’ असा निरोप त्याने दिपालीला दिला. दिपालीने तातडीने ही गोष्ट पोलिसांना कळवली. पोलिसांनी लीलाबाई यांच्या मोबाइल फोनचे लोकेशन तपासले. त्यानुसार खेड येथून अशोकला ताब्यात घेण्यात आले.

खरे तर, मनीषा आणि पूनम या दोघींनी आपल्या आईच्या बेपत्ता होण्याची तक्रार पेण पोलीस ठाण्यात नोंदवली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, या दोघीही बेपत्ता झाल्याचे समोर आले. पोलिसांना मात्र, या तपासात यश मिळत नव्हते. अशावेळी अशोकने लीलाबाई यांच्या मोबाइलचा वापर करून दिपालीला केलेला ‘कॉल’ त्यांच्यासाठी महत्त्वाचा धागा ठरला.

अशोकला ताब्यात घेतल्यानंतरही त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. हा मोबाइल आपला मित्र अविनाश याला सापडला होता, असे तो वारंवार सांगत होता. तेव्हा पोलिसांनी अशोकचा मित्र अविनाश तुकाराम भोसले याला ताब्यात घेतले. मात्र तोही काही माहिती देण्यास तयार नव्हता. पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी आणि उपनिरीक्षक सारंग या प्रकरणाचा तपास करत होते. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते. परंतु, मृतदेह हाती लागत नसल्याने बेपत्ता झालेल्या तिघींचे काय झाले, हे कळण्यास मार्ग नव्हता. अशावेळी पोलिसांनी अशोकला आपला खाक्या दाखवला. सुरुवातीचे तीन दिवस माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अशोकने पोलिसांचा रुद्रावतार पाहून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली व तिघींचे मृतदेह फेकल्याची ठिकाणेही त्यांना दाखवली.

तपासात पोलिसांना दाखवलेली तत्परता फळाला आली, मोबाइल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अशोकचा ठावठिकाणा गाठण्यात यश आले. तर चौकशी दरम्यान दाखवलेल्या कौशल्यामुळे तिघींच्या मृतदेहांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. पोलिसांच्या तत्परतेमुळे दिपालीचा जीव वाचला. सध्या अलिबाग येथील सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.