सीआरझेडचे नियम डावलून मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर भरणी करून उभारलेला ‘वॉक-वे’ आणि ‘ट्रायपॉड’मुळे किनाऱ्यालगतच्या रस्त्यांवर लाटांचे पाणी शिरले. यास सर्वस्वी मेरीटाइम बोर्ड जबाबदार असल्याचा आरोप महापौर सुनील प्रभू यांनी शुक्रवारी केला. गेले दोन दिवस समुद्राला उधाण आले असून उंच लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत. त्यामुळे माहीम, वरळी, दादर आदी भागातील वस्त्यांमध्ये समुद्राचे पाणी शिरले. एक विशेष उच्चस्तरीय समिती नेमून या घटनेची चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, असे आदेश सुनील प्रभू यांनी पालिका प्रशासनाला दिले.महापालिकेला विश्वासात न घेता सीआरझेडचे नियम डावलून माहीम, दादर व वरळी येथील स्थानिक आमदारांच्या अट्टाहासापोटी मेरीटाइम बोर्डाने समुद्रकिनाऱ्यावर भरणी करून ‘वॉक-वे’ तयार केले. तसेच भरणी टाकून ‘ट्रायपॉड’ही उभारले. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून समुद्राचे पाणी रस्त्यावर आले, असे ते म्हणाले.

१८, १९ जूनला द. मुंबईत २० टक्के पाणीकपात
मुंबई : मरोशी ते रुपारेल जलबोगदा प्रकल्पाअंतर्गत जलवितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि इतर दुरुस्तीच्या कामानिमित्त १८ आणि १९ जून रोजी मुंबई शहरातील भागामधील पाणीपुरवठय़ामध्ये २० टक्के कपात करण्यात येणार आहे. मरोशी ते रुपारेल बोगदा प्रकल्पाअंतर्गत जलवितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी व इतर दुरुस्तीच्या कामासाठी सहार एॅकर ब्लॉक ते वांद्रे एॅकर ब्लॉकदरम्यान ९६ इंच व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीवरील काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम १८ जून रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार असून १९ जून रोजी सकाळी १० वाजता पूर्ण होईल असा अंदाज आहे.
या काळात कुलाबा, काळबादेवी, चिराबाजार, गिरगाव, ताडदेव, भायखळा, परळ, दादर, प्रभादेवी आदी भागांमध्ये २० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. या विभागातील रहिवाशांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

छोटा राजनच्या गुंडास अटक
मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या टोळीतील सक्रीय सदस्य विजय महाडिक ऊर्फ राजू याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ७ च्या पथकाने मुलुंड येथे अटक केली. त्याच्याकडून विदेशी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. महाडीक गुरुवारी ऐरोली टोल नाक्यावर साथीदाराला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ७ च्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी तीन पथके तयार करून सापळा रचला़  रात्री नऊच्या सुमारास महाडिक तेथे आला असता पोलिसांच्या पथकाने त्याला झडप घालून अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल ढोले, संतोष सावंत, प्रविण पाटील, विजय कदम आदींच्या पथकाने त्याला अटक  केली.

लग्नास नकार दिल्याने तरुणाची आत्महत्या
मुंबई : लग्नास नकार दिल्याने एका तरुणाने प्रेयसीच्या घरासमोरच स्वत:च्या अंगावर चाकूने वार करून आत्महत्या केली. जाफरून हसन मोहम्मद आसिफ (२२) असे या तरुणाचे नाव आहे. मानखुर्द येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली.मूळचा बिहारचा आसिफ डोंगरी येथील एका मदरशामध्ये शिक्षण घेत होता. याच काळात त्याचे मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंड येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. मात्र नंतर तिने लग्नास टाळाटाळ सुरू केली होती. गुरुवारी रात्री आसिफ तिच्या घरी गेला. यावेळी तिने ठाम नकार दिल्याने त्याने पोटात चाकू खुपसून घेतला़