इमारतीत झालेल्या अनधिकृत बांधकामाची वेळीच तक्रार केल्याने संभाव्य अपघात दादर येथे टळला. अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची पत्नी तृप्ती यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात इमारतीत झालेल्या बांधकामाविषयी तातडीने तक्रार दिली होती. तसेच, बांधकामाविषयी जाब विचारल्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पोलिसांना कळविले होते. मात्र, पोलीस कारवाईला घाबरून बिल्डरने अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्याचे आश्वासन दिले आहे.

सिद्धार्थ जाधव दादरच्या बाया पार्कमध्ये राहतात. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा आहे. तर तिसऱ्या मजल्यावर एका रहिवाशाने अनधिकृत बांधकाम केले होते. हे बांधकाम पडले तर दुसऱ्या मजल्यावर खेळणाऱ्या मुलांच्या जिवाला धोका संभवतो, म्हणून सिद्धार्थची पत्नी तृप्ती जाधव यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. तसेच, बांधकामाविषयी जाब विचारल्यानंतर बिल्डरने त्या बांधकामाला परवानगी नसल्याचे स्पष्ट करतानाच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्याविषयीही तक्रार केली. पोलिसांनी धमकी दिल्याने बिल्डरविरोधात अदखलपात्र तक्रार नोंदवून घेतली तर बांधकामाविषयीची माहिती पालिकेला कळविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पोलिसांत तक्रार झाल्याचे कळताच बिल्डरने जाधव यांना बांधकाम तोडण्याचे आश्वासन दिले. माझी पत्नी तृप्ती हिने पोलिसांमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर हे प्रकरण निवळले आहे, असे सिद्धार्थ याने ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. बिल्डरने दोन दिवसांनंतर ते अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्याचे आश्वासन दिले असून त्याच्या कारवाईची आम्ही वाट पाहात असल्याचेही तो म्हणाला.