कंत्राटदारांच्या कामचुकारपणामुळे नागरिकांना मनस्ताप; गॅस दाहिनीत अर्धवट जळालेले मृतदेह लाकडी चितेवर जाळण्याची वेळ

शीव येथील  हिंदू स्मशानभूमीत कंत्राटदाराच्या कामचुकारपणामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मृतदेहांचे दोनदा दहन करण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. पीएनजी (पाईप नॅचरल गॅस)वर चालणाऱ्या दाहिनी नीट चालत नसल्यामुळे अर्धवट अवस्थेत जळालेले मृतदेह पुन्हा लाकडाच्या चितेवर ठेवून जाळावे लागत आहेत. गेल्या चार महिन्यांत दोनदा अशा घटना घडल्या आहेत.

पालिकेच्या एकूण ५८ स्मशान भूमी आहेत. त्यापैकी  ११ ठिकाणी पालिकेच्या विद्युत दाहिनी आहेत. या विद्युत दाहिनींचे सीएनजी आणि पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) दाहिनीमध्ये परावर्तन करण्यात आले आहे. शीव येथील हिंदू स्मशान भूमीतही पीएनजी दाहिनी आहे. मात्र या विद्युत दाहिनीचे काम योग्य प्रकारे होत नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सोसावा लागतो आहे. येथील भाजपच्या नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी याबाबतचा हरकतीचा मुद्दा स्थायी समितीमध्ये उपस्थित केला. या दाहिनीचे काम नीट होत नसल्यामुळे तास तासभर मृतदेह दाहिनीत टाकून वाट बघावी लागते. मग मृतदेह अर्धवट जळाल्यामुळे नातेवाईकांना सांगून पुन्हा लाकडी चितेवर अंत्यसंस्कार करावे लागतात. या अक्षम्य प्रकारामुळे मृतांच्या जिवलगांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते. गेल्या चार महिन्यांत दोनदा अशा घटना घडल्या असून एका घटनेत तर तरुण मुलाचे अंत्यसंस्कार त्याच्या वृद्ध वडिलांना दोनदा करावे लागले होते, याबाबत शिरवडकर यांनी आवाज उठवला असता पीएनजी वाहिनीचे काम करणारा एकच कंत्राटदार पुढे आला होता म्हणून त्याला हे काम दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

शीव स्मशानभूमीमध्ये मोठय़ा प्रमाणावर मृतदेह जाळण्यासाठी येतात. या परिसरात शीव रुग्णालयात आलेले अनोळखी मृतदेह इथेच आणले जातात, अशी माहिती शिरवडकर यांनी दिली. त्यामुळे या दाहिनीवर ताण येतो. इथे दोन दाहिनी असून त्यापैकी एका दाहिनीवरचा ताण वाढला की दुसरी सुरू केल्यानंतर ती सुरू व्हायला, तापायला बराच वेळ घेत असल्याची माहिती शिरवडकर यांनी दिली.