३१ वृक्षांची कत्तल, ३८ वृक्षांच्या पुनरेपणाची मागणी

माझगाव परिसरातील प्रिन्स अली खान रुग्णालय संकुलातील रहिवाशी इमारतीच्या पुनर्बाधणीत ६९ वृक्षांचा अडथळा निर्माण झाला असून ही झाडे हटविण्यास परवानगी मिळावी यासाठी रुग्णालय प्रशासनाने पालिकेकडे प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार ३१ झाडांची कत्तल, तर ३८ झाडांचे पुनरेपण करण्यात येणार आहे.

माझगाव येथील प्रिन्स अली खान रुग्णालय संकुलातील रहिवाशी इमारतीची पुनर्बाधणी करण्यात येणार असून तेथील २०९ पैकी ६९ झाडे इमारतीच्या पुनर्बाधणीत अडथळा ठरत आहेत. यामध्ये बॉटल पाम, आंबा, बदाम, जांभूळ, भेंडी, निम, गुलमोहर, अशोक, सप्तपर्णी, नारळ, सोहमोहर, बिट्टी आदी प्रकारच्या ३१ झाडांची कत्तल करण्यास, तर उर्वरित ३८ झाडांचे पुनरेपण करण्यास परवानगी मिळावी म्हणून पालिकेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच कत्तल करण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात मोकळ्या जागेत किंवा मनोरंजन मैदानात १५ दिवसांमध्ये नवी झाडे लावण्याची, तसेच झाडांचे पुनरेपण करण्याची तयारी रुग्णालयाने दाखविली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे माझगाव परिसराशी संबंध नसलेले वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आणि कुर्ला येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक आणि अंधेरी येथील काँग्रेसचे नगरसेवक जगदीश कुट्टी अमीन यांनी या जागेची पाहणी केली असून ही झाडे हटविण्यास या दोघांनीही सहमती दर्शविली आहे.

मुंबई सेंट्रल येथे होऊ घातलेल्या मेट्रोच्या स्थानकाआड येत असलेली झाडे हटविण्यास शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे या प्रस्तावाबाबत शिवसेना कोणती भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.