मुंबई : शहरातील ४८ वर्षीय महिलेचे लहान आतडे पुण्यातील एका व्यक्तीला प्रत्यारोपित करण्यात आल्याने त्याला जीवनदान मिळाले आहे. महाराष्ट्रासह पश्चिमेकडील राज्यांमध्ये प्रथमच लहान आतडय़ाचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. या वर्षांत १६ दात्यांनी ४७ अवयवदान केले आहेत.

टिळकनगर येथील एसआरव्ही रुग्णालयात ४८ वर्षीय महिला मेंदूमृत (ब्रेनडेड) झाल्यावर तेथील अतिदक्षता विभागातील डॉ. अवंती भावे, डॉ. कुशल बांगर यांच्यासह रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांचे अवयवदान करण्यासाठी समुपदेशन केले. रुग्णालयाच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर प्रशासनाने विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वयक केंद्र (झेडटीसीसी) अधिकाऱ्यांना याविषयी माहिती दिली. हे रुग्णालय अवयवदान करण्यासाठी प्रमाणित नसल्याने झेडटीसीसीच्या मार्गदर्शनाखाली दात्याला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले.

फोर्टिसमध्ये रुग्णाचे लहान आतडय़ासह मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड दान करण्यात आले. दात्याचे हृदय प्रत्यारोपणासाठी योग्य नसल्याने ते दान करता आले नाही, अशी माहिती ‘झेडटीसीसी’ने दिली.

लहान आतडय़ाची कार्यक्षमता कमी झाल्यास किंवा रक्तपुरवठा होण्यात अडचण असल्यास आतडे काढून टाकावे लागते. अशा वेळी रुग्णांमध्ये आतडय़ाचे प्रत्यारोपण करण्याचा मार्ग असतो, असे झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. एस. के. माथूर यांनी सांगितले.