News Flash

लैंगिक आजाराच्या खुणा नोंदवणारा स्मार्ट ‘निरोध’!

‘आय डॉट कॉन’ या ब्रॅण्डचे हे स्मार्ट निरोध एका ब्रिटिश कंपनीकडून बाजारात आणले जाणार आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

गर्भधारणा रोखण्याबरोबरच गुप्तरोगांनाही आळा घालणारे साधन

गर्भधारणा रोखण्याचे साधन एवढय़ासाठीच वापरला जाणारा ‘निरोध’देखील आता कात टाकत असून नवा ‘स्मार्ट कंडोम’ अर्थात या युगाचा ‘हुश्शार निरोध’ आता नुसतं गर्भधारणा रोखण्याचीच जबाबदारी उचलणार नसून या जोडप्याच्या लैंगिक, शारीरिक तपासण्यांमध्येही महत्त्वाचा वाटा उचलणार आहे! या ‘निरोध’ला जोडलेली मायक्रोचिप ही जबाबदारी पार पाडणार असून ही मायक्रोचिप स्मार्टफोनला जोडून ही माहिती साठवलीही जाणार आहे. ब्रिटनमध्ये या ‘निरोध’ची मागणी सुमारे लाखभर ग्राहकांनी नोंदवली आहे. भारतात हे ‘निरोध’ साडेतीन ते पाच हजार रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

या जानेवारी महिन्यात हा ‘निरोध’ आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे युरोपात त्याची चर्चा जोरात रंगली आहे.  ‘आय डॉट कॉन’ या ब्रॅण्डचे हे स्मार्ट निरोध एका ब्रिटिश कंपनीकडून बाजारात आणले जाणार आहेत. आतापर्यंत लाखभर ग्राहकांनी या निरोधची खरेदीपूर्व नोंदणी केल्याने त्याचा दबदबा वादातीत राहणार आहे.

या निरोधच्या अग्रभागी रबराची मायक्रोचिप बसवली असेल. लैंगिक संबंधांतून  पसरणाऱ्या आजारांची माहिती  या निरोधमुळे मिळू शकेल, असा कंपनीचा दावा आहे. बरेचदा लैंगिक रोगांविषयी लोकांना योग्य ती माहिती नसते. भारतासारख्या परंपरेचा पगडा असलेल्या देशात तर या बाबतीत डॉक्टरांशीही बोलण्याची रुग्णांना लाज वाटते. त्यामुळे वैद्यकीय उपचार अचूक आणि वेगाने होण्यात अनेक अडचणी येतात.

आता मात्र नुसत्या या निरोधच्या मायक्रोचीपच्या पाहणीमुळे रुग्णाने न सांगताच डॉक्टरांना त्याच्या लैंगिक संबंधाची आणि त्यात जर काही आरोग्यदृष्टय़ा धोकादायक असेल, तर त्याची माहिती तात्काळ मिळू शकणार आहे. त्यामुेळ लैंगिक रोगांना आळा घालणे शक्य होणार आहे. त्यामुळे हे निरोध महाग असले तरीही त्यांचे भारतीय आरोग्य वर्तुळात स्वागत होत आहे.

ब्रिटनमध्ये सध्या हे निरोध ५९.९९ पाऊंड किंमतीला उपलब्ध होतील. अमेरिकेत त्यांची किंमत ७४ डॉलर असेल. भारतीयांना ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदीत साधारणत: साडेतीन ते पाच हजार रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहेत.

या उत्पादनाचा फायदा सामान्यांना होईलच, पण त्यासोबत लैंगिक तज्ज्ञांना अचूक निदानासाठी त्याचा अधिक फायदा होणार आहे. रुग्णाने दिलेल्या माहितीवर अवलंबून न राहता तज्ज्ञांना तथ्यपूर्ण माहिती मिळेल आणि त्याचा रोगनिदान आणि उपचारात लाभ होईल.

-डॉ. राजन भोसले, कामविकारतज्ज्ञ, केईम रुग्णालय

नवनवीन तंत्रज्ञानानुसार साकारणाऱ्या अशा उत्पादनांचे स्वागतच केले पाहिजे. भारतात त्याची मागणी वाढली तर त्याच्या किमतीही कमी होऊ शकतील.

-दिलीप मेहता, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन

निरोधच्या जोरावर आरोग्यजाण..

* समागमादरम्यान शारीरिक स्थितीत होणारे बदल, त्याचा कालावधी याचे मापन केले जाईल.

* किती उष्मांक खर्च झाले, याची नोंद होईल.

* त्वचेच्या तापमानाचे मापन होईल.

* अनेक गोष्टींची अचूक सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

* मायक्रोचिप स्मार्टफोनला जोडून ही माहिती साठवता येईल.

* क्लायमेडिया, सिफिलीस आदी कुप्रसिद्ध सांसर्गिक रोगांची माहिती मिळू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2017 3:39 am

Web Title: smart condom to detect sexually transmitted diseases
Next Stories
1 समस्या राजकीय पुढाऱ्यांमुळे उद्भवतात!
2 मराठी ग्रंथसंग्रहालयातील गैरव्यवहारांची चौकशी करा
3 झवेरी बाजार येथील इमारत दुर्घटनेत चौघांचा मृत्यू
Just Now!
X