सांताक्रुझ येथील एसएनडीटी कॉलेजमधील होस्टेलच्या महिला वॉर्डनने जबरदस्तीने अंगावरील कपडे उतरवायला लावल्याचा गंभीर आरोप एका विद्यार्थीनीने केला आहे. दरम्यान, वॉर्डनच्या या कृत्याविरोधात येथील विद्यार्थीनींनी रविवारी दुपारी होस्टेल परिसरात ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर संबंधीत महिला वॉर्डनला चार दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी तक्रार दाखल करुन घेताना पीडित मुलीने आपल्या जबाबात सांगितले की, आपल्याला त्वचेसंबंधीच्या आजारामुळे डॉक्टरांनी बाह्या नसलेला ड्रेस घालण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, मी कॉलेजच्या होस्टेलमध्ये असताना स्लिव्हलेस ड्रेस घातला. मात्र, असा स्लिव्हलेस ड्रेस का घातला याचे कारण विचारताना संबंधीत वॉर्डनने मला नेमके काय झाले आहे, हे दाखव असे सांगत जबरदस्तीने अंगावरचे कपडे उतरवायला भाग पाडले, असा आरोप पीडित मुलीने केला आहे.

मात्र, मुलींनी हॉस्टेलमध्ये स्लिव्हलेस ड्रेस वापरु नये, असा कॉलेजचा नियम असल्याने आपण केवळ या नियमाचे पालन करीत होतो. मात्र, आपल्या नियमांच्या कडक अंमलबजावणीमुळे रागातून संबंधीत विद्यार्थीनीने आपल्याविरोधात तक्रार केल्याचा दावा महिला वॉर्डनने केला आहे. या प्रकरणात अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळते आहे, असे झोन ९चे डीसीपी परमजीतसिंह दहिया यांनी लोकसत्ताच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असून त्यानंतरच या प्रकरणाचा पूर्णपणे खुलासा होईल असे डीसीपी दहिया यांनी सांगितले.