उस्मानाबादमधील सारोळा गावाला मदत
नसíगक आपत्तीमुळे गांजलेल्या बळीराजाला सहकार्य करण्यासाठी दादरच्या किंग जॉर्ज शाळेचे माजी विद्यार्थी सरसावले आहेत. या शाळेतून १९६७ मध्ये एसएससी (तेव्हाची अकरावी) झालेले विद्यार्थी उस्मानाबाद जिल्ह्यातील सारोळा या गावाला पाच लाख रुपयांचा निधी देणार आहेत. प्रसिद्ध समालोचक व लेखक द्वारकानाथ संझगिरी यांची संकल्पना असलेला ‘ट्रिब्यूट टू लिजंड शम्मी कपूर’ हा कार्यक्रम दादरच्या सावरकर स्मारक सभागृहात आज (शुक्रवारी) रात्री आठ वाजता होत आहे. या कार्यक्रमात सारोळा गावाचे उपसरपंच कैलास पाटील यांना हा निधी देण्यात येईल.
या विद्यार्थ्यांनी एसएससी उत्तीर्ण होण्याच्या घटनेचे पन्नासावे वर्ष पुढील वर्षी सुरू होत आहे. समाजऋण फेडण्यासाठी काहीतरी भरीव कार्य करण्याच्या हेतूने या विद्यार्थ्यांनी सारोळा गावाला मदत करण्याचा निर्णय घेतला. या गावाचा अण्णा हजारेंपासून ते राजेंद्रसिंहांपर्यंत अनेकांनी गौरव केला आहे. या गावाने सामूहिक शेतीचा प्रयोग केला असून भूजलाची पातळी वाढावी यासाठीही त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत.
या कामात खारीचा वाटा उचलण्याचा आमचा प्रयत्न असून समाजातील अन्य घटकांनी यापासून प्रेरणा घेतली तर बळीराजापुढील समस्या कमी होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया द्वारकानाथ संझगिरी यांनी व्यक्त केली.
‘बोलंदाजी’ पुस्तकाचे प्रकाशन
दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांच्या पत्नी नीलादेवी या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार असून संझगिरी यांनी लिहिलेल्या बोलंदाजी या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते होणार आहे. देव आनंद, शम्मी कपूर, मधुबाला ते माधुरी, संगीत षटकार, फर्माइश सचिनची आदी कार्यक्रमांसाठी संझगिरी यांनी लिहिलेल्या संहितेचा या पुस्तकात समावेश आहे. मॅजेस्टिक प्रकाशनच्या या पुस्तकाला ज्येष्ठ निवेदक अमीन सायानी यांची प्रस्तावना लाभली आहे.