राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या राजीनाम्यानंतर या घटनात्मक पदाची तात्पुरती जबाबदारी सहयोगी महाधिवक्ता रोहित देव यांच्याकडे सोपविण्याच्या राज्य सरकारचा निर्णय घटनाबाह्य़ असल्याचा दावा करीत विधान परिषदेत बुधवारी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्या वेळी झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करण्यात आले. काँग्रेसचे संजय दत्त, माणिकराव ठाकरे यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा प्रश्न परिषदेत उपस्थित करताना नवीन महाधिवक्ता नियुक्त करण्याबाबत राज्य सरकारने चालविलेल्या चालढकलीबद्दल नाराजी व्यक्त केली. महाधिवक्ता हे घटनात्मक पद असून त्यांच्या नियुक्तीमधील घोळामुळे राज्य सरकारशी संबंधित अनेक खटल्यांवर परिणाम होत असल्याची टिपण्णी न्यायालयाने केली आहे. तरीही गेल्या दीड वर्षांत सरकारला चांगला महाधिवक्ता सापडलेला नाही अशी टीका दत्त करीत असताना, उपसभापती वसंत डावखरे यांनी दत्त यांचा स्थगन प्रस्ताव फेटाळल्याचे जाहीर केले.