गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या आसपासच अमेरिकेत #MeToo ही चळवळ सुरु झाली. हॉलिवुडच्या अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं. त्याआधीही २००६ मध्ये सामाजिक कार्यकर्त्या तराना ब्रुक यांनी पहिल्यांदा MeToo हा शब्द वापरून त्यांना काय काय अनुभव आले ते कथन करण्याचे काम केले होते. लैंगिक शोषण, छळ, गैरवर्तन याबाबत त्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. त्यानंतर सुमारे ११ वर्षांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये #MeToo हा शब्द सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला. कारण ट्विटरवर या शब्दाचा हॅशटॅगच तयार करण्यात आला आणि तो ट्रेंडही झाला. आपल्याकडे एखादी गोष्ट सुरु व्हायची असेल तर ती आधी अमेरिकेत सुरु व्हावी लागते असा प्रघातच आहे. त्याच प्रघातानुसार ही चळवळ आपल्याकडे पोहचण्यासाठी वर्ष लागलंच. १५ ऑक्टोबर २०१७ ला जेव्हा पहिल्यांदा जेव्हा #MeToo हा शब्द ट्विट केला गेला तेव्हा त्यादिवशी दिवसाखेर २ लाखवेळा वापरण्यात आला. त्यानंतर सुमारे ५ लाखवेळा तो रिट्विट करण्यात आला.

आपल्याकडे सुरुवात कशी झाली?
अभिनेत्री तनुश्री दत्ताने भारतात MeToo ला वाचा फोडली. दहा वर्षांपूर्वी हॉर्न ओके प्लीजच्या सेटवर नाना पाटेकरांनी आपल्यासोबत गैरवर्तन केलं असा आरोप तिने केला. तनुश्री दत्ताने हे आरोप केल्यानंतर बॉलिवुडमधल्या अनेक अभिनेत्री, सहकलाकार या सगळ्यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपांची आठवण आली. त्यांनीही भरभरून आरोप करण्यास आणि फेसबुकच्या पोस्ट भरण्यास सुरुवात करत त्यांच्यावर झालेल्या अन्यायांना वाचा फोडली. आलोकनाथ, कैलाश खेर, पियुष मिश्रा, सुभाष घई यांच्यासारख्या अनेकांवर आरोप झाले. आलोक नाथ यांच्यावर तर बलात्काराचा आरोप झाला. महानायक अमिताभ बच्चन यांच्यावरही आरोप करण्यात आले. तुम्हीही यातून सुटणार नाही असे म्हणत त्यांच्याविरोधातही पोस्ट आणि ट्विटची मालिका पोस्ट करण्यात आली.

बॉलिवुडमधले हे प्रकार समोर येत असतानाच महिला पत्रकारांनीही त्यांच्यावर झालेल्या अन्यायांना वाचा फोडण्यास सुरुवात केली. पत्रकार संध्या मेननने बी. जी. कोळसे पाटील, लेखक किरण नगरकर आणि सुप्रसिद्ध फोटोग्राफर पाब्लो बार्थलोम्यू या तिघांनी कशाप्रकारे शोषण केले ते समोर आणले. त्यानंतर राजकारणातलेही प्रकार समोर आले. केंद्रीय मंत्री एम. जे अकबर यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले.

आरोप करून काय साध्य झालं? आणि काय प्रश्न निर्माण होतात?
सर्वात आधी तनुश्री दत्ताचा विचार करता तिने आत्ता या सगळ्या अन्यायाला वाचा फोडली कारण तिला मी टू बाबत विचारण्यात आले. पण त्यावेळी म्हणजे दहा वर्षांपूर्वी जेव्हा हे सगळे प्रकार घडले तेव्हा तनुश्री शांत का बसली होती? की तेव्हा तिला याची जाणीव झाली नव्हती की आपल्यासोबत गैरवर्तन झाले आहे. जर त्यावेळी तिने पोलिसात तक्रार दिली होती तर त्याचा पाठपुरावा का केला गेला नाही? दहा वर्षांनी तिला हे सगळं सुचणं, तिने नाना पाटेकरांना, राज ठाकरेंना यामध्ये गोवणं हे सगळं व्यवस्थित प्लान केल्यासारखं वाटतं आहे. कदाचित तिने केलेले आरोप खरेही असतील पण ते आत्ता खरे धरायचे ते कोणत्या निकषांवर? नाना पाटेकरांनी दहा वर्षांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली. मग त्याला उत्तर देण्यासाठी तनुश्रीने पत्रकार परिषद का घेतली नाही?

परवाच आलोकनाथ यांच्यावर आरोप करताना हिमानी शिवपुरी यांनी म्हटलं आहे की आलोकनाथ माझ्या खोलीत आले ते जायला तयार नव्हते मी त्यांना जा सांगितलं त्यांनी ऐकलं नाही. मग मी रडू लागले, आरडाओरडा केला मग इतर लोक खोलीत आले आणि त्यानंतर आलोकनाथ यांना घेऊन गेले. हा प्रसंग मी विसरले होते पण मी टू मोहिमेमुळे मला तो पुन्हा आठवला. या त्यांच्या वाक्यात सरळ सरळ आलोकनाथ यांची बदनामी करण्याचा उद्देश दिसतो. पियुष मिश्रांवर आरोप केलेल्या महिला पत्रकाराने म्हटले मी त्यांची फॅन होते म्हणून त्यांच्यासोबत पार्टीला गेले होते. दारूच्या नशेत त्यांनी माझा हात पकडला होता आणि मला जवळ बसवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मी ओरडले मग बाकीचे लोक आले आणि पियुष मिश्रांना घेऊन गेले. यामध्येही स्पष्ट दिसतो आहे तो बदनामीचा उद्देश वरील दोन्ही उदाहरणांमध्ये या महिलांनी आणखी काही होईपर्यंत वाट बघायला हवी होती का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. पण तिथे त्यांनी तुमच्यासोबत गैरवर्तनाचा प्रयत्न केला तो तुम्ही आरडाओरड करून मिटवलात मग आता तुम्हाला त्याची आठवण का येते आहे? हा प्रश्न उरतोच.

जी बाब बॉलिवुडमधली तीच महिला पत्रकारांचीही. किरण नगरकर यांची मुलाखत घेण्यासाठी मी हॉटेलमध्ये गेले होते. तिथे माझ्या कॅमेरामनने मला ऐनवेळी येत नाही सांगितले. मग मी एकटीच नगरकर यांच्या हॉटेलरुमवर गेले असे महिला पत्रकाराने सांगितले. एकटं जाण्याचं धाडस या महिला पत्रकाराने का केलं? किरण नगरकर माझ्या जवळ येऊन बसण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी तिने स्पष्ट शब्दात त्यांना का बजावलं नाही? किंवा याबाबत आपल्या वरिष्ठांना का कळवलं नाही हा प्रश्न उरतोच. बॉलिवुड असो, राजकारण असो किंवा प्रसारमाध्यमे असोत कोणीही धुतल्या तांदळाचे नाही. तनुश्री दत्तालाही ती जे करते आहे ते आयटम साँग आहे, याची पूर्ण कल्पना होती. आयटम साँगची संकल्पना आपल्याकडे केव्हाच रुजली आहे. सिनेमातला एखादा शो पिस म्हणून आयटम साँगमध्ये अभिनेत्रीला सादर केले जाते. मग तनुश्री दत्ताला जर इतका प्रॉब्लेम होताच तर तिने आयटम साँग करण्यास होकार का दिला?

कदाचित असेही असेल की या ज्या कोणी महिला बोलत असतील त्यात त्यांची बाजू सत्यही असेल. पण त्या सत्याचे निकष इतक्या वर्षांनी कसे लावले जाणार? एकाही पुरुषाची बाजू का ऐकून घेतली जात नाही? मध्यंतरी अर्जुन रामपाल आणि चित्रांगदा सेन यांच्या भूमिका असलेला इन्कार नावाचा एक सिनेमा आला होता. या सिनेमात कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारी महिला एखाद्या गोष्टी कशा बदलू शकते यावर भाष्य करण्यात आलं होतं. एकीकडे आपण स्त्री, पुरुष समानता; पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत हे अभिमानाने सांगतो आणि दुसरीकडे मी टू चे आरोप झाले की पुरुषांकडे संशयी नजरेने पाहतो. कदाचित असेही असू शकते की त्यावेळी त्या दोघांमध्ये जे घडते ते परस्पर सहमतीने असते त्यानंतर काही वर्षांनी त्याच्याकडून वचन पाळले गेले नाही की त्याने माझे शोषण केले अशी बोंब ठोकायला ती मोकळी. कोणत्याही गोष्टींना दोन बाजू असतात. मीटूबाबतही तेच आहे. महिलांनी पुढे येऊन बोललंच पाहिजे त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार, अन्यायाचं समर्थन होऊ शकत नाही पण त्याचसोबत पुरुषांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी.

#MeToo ची थट्टाही!

#MeToo ही चळवळ ज्याप्रकारे हॉलिवुडमध्ये चालली त्याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले. आपल्याकडे मात्र महिला अत्याचारांसारख्या इतक्या गंभीर चळवळीवर जोक होऊ लागले आहेत. सनी लियोनीने कोणावरही MeToo चा आरोप केला नाही आणि इम्रान हाश्मीवर कोणीही MeToo चा आरोप केला नाही. लहानपणी मी शाळेत असताना कोळी नृत्य केलं होतं तेव्हा एका लहान मुलीचा हात धरला होता ती मुलगी तर आता मी टू ची तक्रार करणार नाही ना? हे आणि असे अनेक जोक आपल्याकडे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. महिला अत्याचारांसारख्या मुद्द्याची अशी खिल्ली उडणार असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव काय?

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या देशात बलात्कार, लैंगिक छळ, हुंडाबळी यांसारख्या अनेक घटना घडतात. चिमुरड्या मुलींवर बलात्कार होतात. मुलींची विक्री होते, इच्छा नसताना अनेक मुलींना वेश्या व्यवसायाच्या खाईत ढकलण्यात येते. तेव्हा ही हॅशटॅग मी टू चालवणारी मंडळी कुठे असतात? बलात्कार झाल्यावर मेणबत्त्या जाळणारे आणि अनेक वर्षांपूर्वी झालेल्या सो कॉल्ड अत्याचारांना ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून वाचा फोडणारे सारखेच असतात. कारण मेणबत्त्या जाळून काही बलात्काराच्या घटना कमी झाल्या नाहीत. तशाच हॅशटॅग मी टूने ही शोषणाच्या घटना थांबणार नाहीत. त्यांना वाचा फुटते आहे ही निश्चितच सुखावह बाब आहे पण यातला अनेकींचा उद्देश स्पष्ट दिसतो आहे तो म्हणजे बदनामीचा.

परवा मेलानिया ट्रम्प यांनीही ट्विट केलं आहे, ज्या महिलांवर अत्याचार झाला आहे मी त्या सगळ्यांच्या बाजूने आहे. मात्र त्याआधी त्यांनी हे असे घडले होते याचे सबळ पुरावे द्यावेत. आत्ता आपल्याकडे जे अनेक सेलिब्रेटी, राजकारणी यांच्याविरोधात जे आरोपांचं पेव फुटलं आहे त्यात किती आरोप खरे? हे पुरावे दिल्याशिवाय कळणं कठीण आहे. फक्त आरोप होत आहेत, महिला पुढे येऊन बोलत आहेत म्हणून त्यांच्या वाट्टेल त्या आरोपांचं समर्थन करणं गैर आहे. दुसरी महत्त्वाची बाब यामध्ये पुरुषांनाही बोलण्याचा अधिकार हवा. महिला जे सांगतील ते ब्रह्मसत्य असे समजणे खरोखर गैर आहे. #MeToo सारख्या मोहिमा पुढे येत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे.. मात्र त्याचा जो गैरफायदा घेतला जातो आहे ते निश्चितच निषेधार्ह आहे.

समीर चंद्रकांत जावळे