News Flash

सुसाट वाहनांच्या वेगाला उद्यापासून लगाम

द्रुतगती महामार्गासह सर्व रस्त्यांवरील वाहनांना वेगमर्यादा

(संग्रहित छायाचित्र)

अपघात रोखण्यासाठी राज्यात वाहनांच्या वेगावर नव्याने मर्यादा आणण्यात आली असून या निर्णयाची अंमलबजावणी सोमवार, १८ नोव्हेंबरपासून द्रुतगती महामार्गासह (एक्स्प्रेस वे), चार मार्गिका रस्ते आणि महापालिका हद्दीतील रस्त्यांवर केली जाईल, अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली.

द्रुतगती महामार्गावर आठपेक्षा कमी आसनी वाहनांसाठीची प्रतितास १२० किलोमीटरची वेगमर्यादा १०० पर्यंत खाली आणली आहे, तर नऊपेक्षा जास्त आसन क्षमतेच्या वाहनांची वेगमर्यादा प्रतितास १०० किमीवरून ८०वर आणली आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने एप्रिल २०१८ मध्ये एक अधिसूचना काढून वाहनांसाठी नवीन वेगमर्यादा ठरवली होती. एक्स्प्रेस वे सह, चार मार्गिकांचे रस्ते, पालिका हद्दीतील रस्त्यांसह अन्य रस्त्यांचा वापर करणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा वाढवली होती. त्यामुळे एक्स्प्रेस वे साठीची वेगमर्यादा आठ किंवा त्यापेक्षा कमी प्रवासी वाहन क्षमता असलेल्या वाहनांसाठी प्रतितास १०० किलोमीटरहून प्रतितास १२० किलोमीटपर्यंत झाली. तर नऊ व त्यापेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहनांसाठी एक्स्प्रेस वे वर असलेली यापूर्वीची प्रतितास ८० ची मर्यादा १०० पर्यंत वाढवली. राज्यातील चार मार्गिका रस्त्यांसाठीच्या वाहनांसाठी प्रतितास १०० किलोमीटपर्यंत वेग मर्यादा आखली होती. मालवाहू वाहन, तीन चाकी व अन्य वाहनांसाठीही वेगमर्यादा निश्चित करताना त्यात वाढ केली. आता नवीन धोरणानुसार हा वेग आणखी कमी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ते सुरक्षा समितीने रस्ते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्युंमध्ये दरवर्षी १० टक्के घट करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रस्त्यांचा आढावा घेतला असता ३० टक्के प्राणांतिक अपघात सुसाट वाहन चालवल्याने होत असल्याचे निदर्शनास आले. राज्यातील विविध रस्त्यांची भौगोलिक परिस्थिती, भूप्रदेश, घाट रस्ते, वळण रस्ते, सरळ रस्ते आणि रस्त्यांचा चढ-उतार इत्यादी बाबींचा विचार करून प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी वाहनांचा वेग आणखी कमी करण्यावर गृह विभाग, सार्वजनिक बांधकाम, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सर्व महानगर पालिका, वाहतूक पोलीस आणि अन्य संबंधित यंत्रणा काम करत होत्या. त्यानुसार केंद्र शासनाने आखून दिलेल्या वेगमर्यादेऐवजी राज्यातील रस्त्यांची स्थिती आणि अपघात पाहता स्वतंत्र वेगमर्यादा आखण्यावर शिक्कामोर्तब केले. त्याची अधिसूचना काढून १८ नोव्हेंबर २०१९ पासून महाराष्ट्रात नवीन वेगमर्यादेच अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

* एक्स्प्रेस वे वरील घाट, राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील चार अथवा जास्त मार्गिका असणाऱ्या विभाजित मार्गावरील घाट क्षेत्रातही वेगमर्यादा निश्चित केली आहे.

* आठपेक्षा कमी प्रवासी आसन क्षमता असलेल्या वाहनांसाठी प्रतितास ५० किलोमीटर, तर नऊपेक्षा जास्त प्रवासी आसन क्षमता असलेल्या वाहनांसाठी प्रतितास ४० किलोमीटरची वेगमर्यादा निश्चित केली आहे.

* एक्स्प्रेस वे, चार मार्गिका रस्ते व महानगरपालिका रस्त्यांचा वापर करणाऱ्या मालवाहू वाहनांच्या वेगावर मात्र र्निबध आलेले नाहीत. केंद्र सरकारने आखून दिलेली मर्यादाच कायम ठेवण्यात आली आहे.

* ‘लोकसत्ता’मध्ये (६ जानेवारी २०१९) अतिवेगावर अंकुश, अपघात रोखण्यासाठी लवकरच धोरण या मथळ्याखाली बातमीही प्रसिद्ध झाली होती. यात बेदरकार वाहनांमुळे वाढते अपघात पाहता नवीन वेगमर्यादा निश्चित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली होती.

भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने याआधी वाहनांसाठी असलेल्या वेगमर्यादेत वाढ केली होती. त्याची अंमलबजावणीही करण्यात येत होती. परंतु महाराष्ट्रातील अपघातांचे प्रमाण पाहता सरकारने स्वतंत्रपणे वाहनांसाठी नवीन वेगमर्यादा निश्चित केली. त्यानुसार वेगमर्यादा आणखी कमी केली आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून होत आहे, अशी माहिती

– विजय पाटील, पोलीस अधीक्षक, मुख्यालय, वाहतूक-महाराष्ट्र राज्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 1:31 am

Web Title: speed limit for all road vehicles with speeding highways abn 97
Next Stories
1 अदानी, रिलायन्सही टोलवसुलीत!
2 प्रयोगांद्वारे विज्ञानातील गमतीजमती उलगडत बालविज्ञान संमेलनाचे उद्घाटन
3 फुलपाखरांच्या मराठी नावाचे पहिले पुस्तक
Just Now!
X