पहिल्या टप्प्यात १५ हजार बसची साफसफाई

मुंबई : अस्वच्छ आसने, दरुगधी अशी साध्या लालपरी एसटी बसची अवस्था आहे. ती पाहून अनेकांना प्रवास करण्याची इच्छा होत नाही, परंतु आता हीच लालपरी पूर्णपणे स्वच्छ होऊन प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

एसटीने ३१ जानेवारीपर्यंत ‘सखोल स्वच्छता’ ही नवी संकल्पना हाती घेतली असून जानेवारी अखेपर्यंत १५ हजार लालपरी बस स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अस्वच्छतेमुळे अनेकजण एसटी बस, रेल्वे अशा सार्वजनिक वाहनांतून प्रवास करण्याचे टाळतात. त्यामुळेच सखोल स्वच्छता ही संकल्पना एसटी महामंडळाने हाती घेतली असून ती प्रथम एसटीच्या साध्या बससाठी वापरली जात आहे. एसटी फक्त पाण्याचे फवारे मारून धुतल्या जातात. त्यासाठी आगारात स्वयंचलित यंत्रेही आहे.  प्रत्येक आगार आणि बस स्थानकातील किमान दोन बस धुण्याचे काम १ जानेवारीपासून हाती घेतले असून १५ हजार साध्या बस पूर्णपणे स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

प्रत्येक बस नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याची दर १५ दिवसांनी प्रत्येक बसची सखोल स्वच्छताही केली जाणार असल्याचे एसटीच्या जनसंपर्क विभागातून सांगण्यात आले.