राज्यात वर्षांला ५ हजार ९०६ बेवारस मृत्यूंची नोंद होत असून एकटय़ा मुंबई शहरात ही संख्या २ हजारच्या घरात आहे. त्यामुळे निराधारांना आधार देण्यात राज्य शासन सपशेल अपयशी ठरले असून निराधारांसाठी किमान हेल्पलाइन सुरू करण्याची मागणी अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
गलगली यांनी माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. राष्ट्रीय गुन्हा अभिलेखाच्या आकडेवारीनुसार राज्यात गेल्या वर्षभरात ५९०६ बेवारस मृतदेह सापडले. त्यामध्ये मुंबईतच दोन हजार मृत्यूंची बेवारस अशी नोंद झाली आहे. रेल्वे पोलिसांनी गेल्या वर्षभरात ११०० मृत व्यक्तींची बेवारस म्हणून नोंद केली असून त्यामध्ये सर्वाधिक १५७ मृतदेह कल्याण स्थानकात सापडले आहेत.  
कुर्ला स्थानकात १४३, तर ठाणे आणि वाशी स्थानकात प्रत्येकी १०३ बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. गेल्या दहा वर्षांत पनवेल पोलिसांना ९९०, कल्याण पोलिसांना ९८३, ठाणे पोलिसांना ८२८, तर भिवंडीत ३७५ बेवारस मृतदेह आढळून आलेत.
रस्त्यावरील गरीब, असहाय आणि निराधार व्यक्ती सगळेच भिकारी नसतात. त्यांपैकी काही व्यक्ती मानसिक संतुलन बिघडल्याने आपली ओळख गमावून बसतात. रस्त्यावरील बेवारस लोकांची माहिती देण्यासाठी सध्या कोणतीच यंत्रणा नसून अशा व्यक्तींसाठी राज्य सरकारने हेल्पलाइन सुरू करावी, अशी मागणी गलगली यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.