माहितीचे युग किंवा माहितीचा अधिकार यामुळे सरकार पातळीवर गुप्तता पाळणे फारच कठीण जाते. पण २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात एकदा नव्हे तर दोनदा गुप्तता पाळण्यात शासकीय यंत्रणा यशस्वी झाली. कमालीची गुप्तता पाळण्यात आल्यानेच कसाबच्या फाशीची कोणालाच पूर्वकल्पना आली नाही.
२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील नऊ दहशतवाद्यांचा राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या (एन.एस.जी.) कमांडोनी खातमा केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा सहभाग उघड करण्याकरिताच नऊ दहशतवाद्यांचे मृतदेह जे. जे. रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले. हे मृतदेह ठेवून दिले जाणार नाही, असा इशारा काही संघटनांनी दिल्याने जे. जे. च्या शवागाराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच रात्रीच्या वेळी कोणी घुसून गडबड करू नये म्हणून विजेचे झोत लावण्यात आले. मृतदेह किती दिवस सांभाळायचे हा प्रश्न होता. केंद्र सरकारशी सल्लामसलत करून या मृतदेहांचे दफन करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला. भारतीय दफनभूमीत पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मृतदेह पुरू देणार नाही, अशा इशारा मुस्लिम संघटनांनी दिला होता.
नऊ दहशतवाद्यांचे मृतदेह पुरण्याचा निर्णय गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पण गुप्तता पाळण्याचे मोठे आव्हान होते. जे. जे. चे डीन डॉ. तात्याराव लहाने यांना पूर्वकल्पना देण्यात आली व वाच्यता होणार नाही याची खबरदारी घेण्याचा आदेश देण्यात आला. त्या मोहिमेत सहभागी असलेले पोलीस आणि अन्य कर्मचाऱ्यांनाही तसे बजाविण्यात आले. त्यातच फोन टॅप केले जात असल्याची भीती त्यांना घालण्यात आली होती. एक दिवस मध्यरात्री हे मृतदेह बाहेर काढण्यात आले व अज्ञात ठिकाणी त्यांचे दफन करण्यात आले. मृतदेहांचे दफन करण्यात आल्यावर जे. जे. त्या शवगृहातील सुरक्षा व्यवस्था आणि रात्रीच्या वेळी विजेचे झोत कायम ठेवण्यात आले होते. यामुळे कोणालाच काही शंका आली नव्हती. गेल्या वर्षी म्हणजे मार्च २००१ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृह खात्यावरील चर्चेला विधान परिषदेत उत्तर देताना आर. आर. पाटील यांनी नऊ दहशतवाद्यांचे मृतदेह पुरण्यात आल्याचे जाहीर केले. तब्बल सव्वा महिना ही माहिती गुप्त राहिली होती, अशी माहिती पाटील यांनीच तेव्हा दिली होती.
पोलिसांना फोन बरोबर घेण्यास बंदी
कसाबच्या फाशीचा निर्णयही गुप्त राहील याची खबरदारी घेण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती. कसाबला सोमवारी मध्यरात्री ऑर्थर रोड कारागृहातून पुण्याला हलविण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली. कसाबला पुण्याला नेण्यासाठी ४० कमांडोचे पथक तयार करण्यात आले होते. या सर्वाना मंगळवारी दिवसभर पुण्यातच थांबण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे ही मोहिम गुप्त राहावी म्हणून या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना फोन बरोबर घेण्यास मज्जाव करण्यात आला होता. या सर्वाना मोबाईल बरोबर घेता येणार नाहीत, असे आदेश देण्यात आले होते. यामुळेच ही कारवाई गुप्त राहिली. २६/११च्या हल्ल्यातील आरोपींच्या संदर्भात दोन्ही वेळा कारवाई गुप्त राहिल्याबद्दल आर. आर. पाटील यांनीही समाधान व्यक्त केले.     
आयत्यावेळी ठरला कसाबचा मार्ग..
कसाबला आर्थर रोड तुरुंगातून येरवडा येथे स्थलांतरीत करावयाचे आहे, असे राज्य शासनाकडून १० दिवसांपूर्वी राज्याच्या पोलीस महासंचालकांना सांगण्यात आले होते. परंतु शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृतीमुळे लांबलेला हा प्रवास सोमवारी मध्यरात्री अखेर पूर्ण करण्यात आला. सुरुवातीला विमानाने कसाबला पुण्याला नेण्याच्या पर्यायाचा विचार झाला. परंतु कसाबची सुरक्षा पाहता रस्त्यानेच नेणे अधिक सोयीचे असून तीन ते चार तासांत येरवडा येथे पोहोचणे शक्य असल्याचे निश्चित झाले. राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे अतिरिक्त महासंचालक देवेन भारती, मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त सदानंद दाते, राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया आणि तुरुंग विभागाच्या अतिरिक्त महासंचालक मीरा बोरवणकर यांच्या नेतृत्वाखाली अगदी संपूर्ण गोपनीयता राखत हा प्रवास सुरू झाला.
इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दल, फोर्स वन आणि शीघ्र कृती दलातील जवानांचा समावेश असलेल्या पथकाच्या सुरक्षा व्यवस्थेत कसाबला येरवडय़ात नेण्यात आले. मुंबई गाढ झोपलेली असताना गाडय़ांचा प्रचंड ताफा पुण्याच्या दिशेने रवाना झाला. कसाबला हलविण्याचे निश्चित करण्यात आले होते. याची माहिती फक्त अगदी मोजक्याच अधिकाऱ्यांना होती. मुंबई-पुणे मार्गावर कडेकोट परंतु कोणाला कळणारही नाही, असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुणालाही त्याचा थांगपत्ता लागू न देता हा ताफा पुण्याला रवाना झाला तेव्हा खूपच काळजी घेण्यात आली होती.