05 December 2020

News Flash

केंद्राकडे ३८ हजार कोटींची थकबाकी

मदतीत दुजाभाव नको - मुख्यमंत्री

(संग्रहित छायाचित्र)

वस्तू आणि सेवा कराची थकबाकी, केंद्रीय करातील राज्याचा हिस्सा आणि नैसर्गिक आपत्ती मदतपोटी राज्याचे हक्काचे ३८ हजार कोटी रुपये केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत. केंद्र सरकारला पत्रे आणि स्मरणपत्रे पाठवूनही निधी मिळालेला नाही. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विनंती करूनही केंद्राचे पथक आलेले नसल्याचे सांगत मदतीबाबत केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केला.

करोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही केंद्र सरकार राज्याच्या हक्काचे पैसे देत नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रथमच उघड नाराजी व्यक्त करीत करोना, नैसर्गिक आपत्तीत केंद्र मदत करणार नसेल तर सगळ्या गोष्टी अवघड होत जातील, असा सूचक इशाराही दिला. निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना १०६५.५८ कोटी रुपये, पूर्व विदर्भात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या भरपाईचा ८००.८८ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे, पण अद्यापही केंद्र शासनाने कोणतीच मदत दिलेली नाही. केंद्राने देशाचे पालकत्व स्वीकारल्यावर कोणताही दुजाभाव न करता प्रत्येक राज्याला आवश्यकतेनुसार मदत करायला हवी. केंद्राने जीएसटीचे पैसे वेळेवर दिले असते तर या संकटात राज्याला अतिरिक्त कर्ज घेण्याची आवश्यकता राहिली नसती असे त्यांनी स्पष्ट केले.

करोनाच्या परिस्थितीत आतापर्यंत एन ९५ मास्क आणि पीपीई किटसाठी मिळणारा केंद्राने बंद केला आहे. त्यामुळे राज्यावर ३०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे. राज्यात अतिवृष्टी होत असताना पंतप्रधान मोदींनी स्वत:हून फोन करून मदतीची ग्वाही दिली होती. त्यामुळे किमान आता मदत मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलण्याची गरज भासल्यास फोनवर बोलेन, वेळ पडल्यास भेटेन, पुन्हा पत्र पाठवण्याची गरज भासल्यास रीतसर प्रस्ताव पाठवेन, असेही ते म्हणाले.

विरोधी नेत्यांनी योग्य शिकवणी घ्यावी!

* केंद्र सरकार राज्याला मदत करत आहे, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. याबाबत विचारले असता, ‘त्यांनी कोणत्या वर्गाची शिकवणी लावली याची कल्पना नाही, पण त्यांचा अभ्यास सुरू असेल तर योग्य शिकवणी घ्यावी. मग अभ्यास योग्य होईल,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

*  तसेच मदतीबाबत विरोधी पक्षांना काही माहिती हवी असल्यास दिली जाईल, मात्र त्यांनीही राजकारण करू नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. बिहार निवडणूक, एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश तसेच मंत्रिमंडळातील खांदेपालट अशा राजकीय विषयावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातच बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:37 am

Web Title: state rs 38000 crore arrears to center abn 97
Next Stories
1 प्रसारमाध्यमांचे ध्रुवीकरण, मर्यादांचाही विसर : उच्च न्यायालय
2 मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर
3 ‘रिपब्लिक’विरोधात आणखी एक गुन्हा
Just Now!
X