राज्य सरकार कोणत्याही क्षणी टाळेबंदी जाहीर करण्याची शक्यता लक्षात घेऊन तत्पूर्वीच मुंबईतून काढता पाय घेऊन गाव गाठता यावे, यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात सध्या मजुरांनी तोबा गर्दी केली आहे. मात्र गाड्यांची संख्या कमी असल्याने अनेकांना दोन-दोन दिवस टर्मिनस बाहेर ताटकळत राहावे लागत आहे. परिणामी, विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी होऊ लागली आहे.

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण देशात करोनाने थैमान घातले आहे. मुंबईतही पुन्हा एकदा करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. करोनाच्या भीतीमुळे मुंबईत काम करणारे असंख्य मजूर पुन्हा आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तर टर्मिनस परिसरात मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच टर्मिनसमध्ये प्रवेश मिळत असल्याने, तिकीट नसलेल्या प्रवाशांना भर उन्हात टर्मिनस बाहेर ताटकळत राहावे लागत आहे.

मुंबई शहरातील महत्वाच्या रेल्वे टर्मिनसपैकी एक असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याांसह इतर राज्यातून रोज ३० ते ३५ गाड्यांची ये-जा सुरू असते. मात्र करोनाच्या संसर्गामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून सध्या केवळ २० ते २२ गाड्यांचीच टर्मिनसवर ये-जा सुरू आहे. त्यातच राज्यात केव्हाही टाळेबंदी जारी होण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग भीतीपोटी आपल्या गावाकडे निघाला आहे. त्यामुळे सर्वच गाड्यांचे आरक्षण भरले आहे. परिणामी तिकिटासाठी टर्मिनस बाहेर सध्या मोठ्या प्रमाणात या मजुरांची गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष गाड्या सोडल्या जाण्याच्या अफवेमुळे मजुरांची गर्दी होऊ लागल्याने या परिसरात तीन दिवसांपासून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर सध्या सर्वच गाड्या आरक्षित असल्याने आरक्षण मिळेपर्यंत अनेकांना दोन-दोन दिवस टर्मिनस बाहेरच काढावे लागत आहेत.

मजुरांची मागणी लक्षात घेत रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचा प्रयत्न सुरू  केला आहे. मात्र वाढती गर्दी लक्षात घेऊन दिवसभरात चार ते पाच अधिक गाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी काही मजुरांकडून करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी तर येथे गर्दी अधिक वाढल्याने पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केल्याची अफवा पसरली होती. मात्र अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही, अशी माहिती टिळकनगर पोलीस आणि आरपीएफने दिली.