News Flash

संस्कृतींचा सर्जनशील संवेदक

व्ही. एस. नायपॉल यांच्या कादंबरीलेखनाची सुरुवात वयाच्या एकवीस-बाविसाव्या वर्षीपासून झाली.

(संग्रहित छायाचित्र)

‘वेस्ट इंडीज’ हा प्रत्यक्षात विविध देशांचा समूह, त्यांपैकी त्रिनिदाद आणि टोबॅगो या बेटा-बेटांवर वसलेल्या देशातील चगुआना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात उत्तर भारतातून दुबे हे ‘पंडित’ कुटुंबीय १८९४ मध्ये आले आणि तेथेच त्यांनी आपले बस्तान बसविले, इथपासून सर विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांची जीवनकहाणी सुरू होते. पं. रघुनाथ दुबे यांचे एक पुत्र कपिलदेव दुबे (१८७३-१९२६). कपिलदेव यांनी ‘दुबे’ आडनावाचा त्याग केला आणि आपले नावच आपल्या अपत्यांना दिले. यापैकी एक होत्या द्राउपति (द्रौपदी) कपिलदेव. द्रौपदी यांचा विवाह सूरजप्रसाद (श्रीप्रसाद) नायपॉल यांच्याशी झाला. या दाम्पत्याला १७ ऑगस्ट १९३२ रोजी झालेले पुत्ररत्न म्हणजे विद्याधर नायपॉल. आईचे घराणे मोठे. ‘आनंद भवन’ नावाचे भलेथोरले दुमजली घर विद्याधर यांचे आजोबा, कपिलदेव यांनी बांधले. त्याच घराबद्दल पुढे ‘अ हाऊस फॉर मिस्टर बिश्वास’ ही कादंबरी लिहिली गेली! कपिलदेव हे जरी मजूर म्हणून आले असले, तरी अल्पावधीत एका ऊस-मळ्याचे मालक झाले. त्यांच्या घराण्यातील पुरुष- आणि स्त्रियाही- हिंदू उच्चवर्णीय अस्मिता टिकवणारे होते. या साऱ्याचा संबंध, नायपॉल यांच्या सामाजिक- राजकीय व धर्मविषयक भूमिकांशी असावा, असे त्यांच्या टीकाकारांना वाटते.

व्ही. एस. नायपॉल यांच्या कादंबरीलेखनाची सुरुवात वयाच्या एकवीस-बाविसाव्या वर्षीपासून झाली. त्यापूर्वीपासून वाचनाचे, वाङ्मयाचे संस्कार त्यांच्यावर त्यांच्या पत्रकार वडिलांनी केले होते. वयाच्या अठराव्या वर्षी पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स नॅशनल कॉलेज या संस्थेतून मॅट्रिक होतानाच, त्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि इंग्लंडला जाऊन ऑक्स्फर्डमध्ये शिकण्याचे त्यांचे स्वप्न सुकर झाले. विद्याधर यांच्या वडिलांनीही मुलगा विलायतेत असावा, ही महत्त्वाकांक्षा बाळगली होती. ऑक्स्फर्डमध्ये असताना वडिलांशी त्यांचा झालेला पत्रव्यवहार, पुढे ‘लेटर्स बिट्वीन अ फादर अ‍ॅण्ड सन’ या नावाने पुस्तकरूप झाला. ऑक्स्फर्डमध्येच नायपॉल यांच्या ललितलेखनाला धुमारे फुटत होते, पण पहिल्या कादंबरीचे बाड लिहून पूर्ण होण्याआधीच ते शिक्षण संपवून मायदेशी आले. येथेच त्यांनी आणखी एक कादंबरी लिहायला घेतली. प्रकाशनविश्वाच्या लहरीपणाचा अनुभव साऱ्याच नव-लेखकांना येतो, तसा व्ही. एस. नायपॉल यांनाही आला.. त्यांचे पहिले बाड अप्रकाशितच राहिले आणि दुसरे मात्र ‘मिस्टीक मॅस्यूर’ या नावाने १९५७ साली प्रकाशित झाले. ‘मॅस्यूर’च्या यशामुळे लगेच पहिल्या बाडालाही पुस्तकरूप मिळाले, ती ‘द मिग्युएल स्ट्रीट’ ही कादंबरी! प्रकाशन कालानुसार ‘मिग्युएल स्ट्रीट’ तिसरी, पण तो नायपॉल यांचा पहिला लेखनप्रयत्न होता. ‘मॅस्यूर’मध्ये स्थलांतरितांच्या संस्कृतीकडे तसेच या बेटवजा देशाच्या एकंदर अर्धकच्चेपणाकडे नायपॉल यांनी वाचकांचे लक्ष वेधले आहे. ती तऱ्हा इतकी नवीन ठरली की, हेच नवलेखक म्हणून नायपॉल यांच्या लोकप्रियतेचे गमक ठरले. ‘द सफरेज ऑफ अलविरा’ ही दुसरी कादंबरीदेखील असा टीकेचा कटाक्ष टाकणारी होती. प्रांतिक कायदेमंडळांद्वारे वसाहतींमध्ये लोकशाही रुजवण्याच्या प्रयत्नांचा कसा बोजवारा उडतो आहे, याचे चित्रण ‘अलविरा’मध्ये होते. चौथी- ‘अ हाऊस फॉर मि. बिस्वास’ (१९६१) ही कादंबरी नायपॉल यांना लेखक म्हणून पूर्णत: प्रस्थापित करणारी ठरली.

नायपॉल यांच्या पहिल्या चारही कादंबऱ्या त्रिनिदाद-टोबॅगोसारख्या वसाहती देशांमध्ये घडतात, तेथील भारतीय स्थलांतरितांचे चित्रण करतात. पण त्यांचा लेखकीय दमसास यापेक्षा किती तरी मोठा होता. जगण्याच्या ओघात ते संस्कृतींचे निरीक्षण करत होते, सभोवतालच्या माणसांचे गुणदोष टिपतानाच ही व्यक्तिमत्त्वे अशीच घडविण्यात संस्कृतीचा वाटा किती याचाही विचार करीत होते.

‘द मिडल पॅसेज’ या पुस्तकात (१९६२) त्यांनी ब्रिटिश, फ्रेंच, डच, वेस्ट इंडियन आणि दक्षिण अमेरिकी अशा पाच संस्कृतींचा मागोवा घेतला. आफ्रिकेतून समुद्रमार्गे दक्षिण अमेरिकेत, असा वसाहतवादाचा झालेला प्रसार, त्यातून वेस्ट इंडीजची वसाहतकारांनुसार झालेली विभागणी, हे सारे या पुस्तकात त्यांनी अशा ताकदीने मांडले की, इतिहास- समाजकारण, संस्कृती या साऱ्यांचे विचक्षण अभ्यासक म्हणून नायपॉल यांची वाहवा होऊ लागली.

भारताचा अभ्यास

नायपॉल १९६३ साली भारतात आले आणि ‘अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. हा माणूस फार तर प्रवासवर्णन लिहील, अशा समजुतीने त्यांना भारत दाखविणाऱ्यांनी भारतीयांबद्दल आणि भारतीय संस्कृतीच्या प्रश्नांबद्दल जी जी मते व्यक्त केली, ती सारी नोंदवत, १९४७ साली भारताने पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात कशी भंगून जात आहेत, हे नायपॉल यांनी पहिल्यांदा दाखवून दिले. ‘इंडिया अ वून्डेड सिव्हिलायझेशन’ (१९७७) आणि ‘इंडिया : अ मिलियन म्यूटिनीज नाऊ’ (१९९०) ही पुढली पुस्तके भारताचा अभ्यास करणारी आहेत. असा अभ्यास करण्याची नायपॉल यांची रीत विद्यापीठीय नाही. आर. के. नारायण किंवा यू. आर. अनंतमूर्ती यांच्यासारख्या लेखकांची पुस्तके वाचून, गांधीवाद आणि त्याचे अपयश समजून घेण्याचा प्रयत्न करून, भारताचा इतिहास मिळेल तेथून वाचत आणि प्रवासात जे कुणी भेटतील त्यांची या इतिहासाबद्दलची मतेही नोंदवत ते भारताकडे पाहतात.‘अ वून्डेड सिव्हिलायझेशन’साठी ऐन आणीबाणीच्या काळात त्यांनी भारताचा प्रवास केला. ‘‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या लवकर आणीबाणी लादण्याची वेळ येणे, हे भारताच्या सर्जनशीलतेची अकार्यक्षमता (क्रिएटिव्ह इनकपॅसिटी), बौद्धिक दिवाळखोरी, संरक्षण-दौर्बल्य आणि प्रत्येक भारतीयाच्या मनातील ‘भारताच्या कल्पने’चे अपुरेपण दाखवून देणारे आहे,’’ असा निष्कर्ष तर ते या पुस्तकात नोंदवतातच, पण भारतीय लोक झडझडून काम का करीत नाहीत, भविष्य घडवत का नाहीत, अशी नापसंतीही व्यक्त करतात. पुढल्या ‘मिलियन म्यूटिनीज’मध्ये मात्र त्यांचा सूर जरा मवाळ झालेला दिसतो. तरीही, नायपॉल यांच्या कुतूहलाला कुत्सितपणाची किनार आहे की काय, हा प्रश्न भारतीय वाचकांपुढे कायम राहतो.

तत्त्वज्ञान कोणते?

नायपॉल यांच्या लिखाणातून काही तत्त्वबोध होत असल्यास तो कोणता? नायपॉल यांचे तत्त्वज्ञान कोणते? याचा शोध अनेक अभ्यासकांनी आजवर घेतला. तो आजही अपुराच आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतरही तो सुरूच राहील. मात्र, नायपॉल हे आधुनिकतावादातील वैफल्य जाणणारे आणि मानवी संस्कृतीच्या संवेदना सर्जनशीलपणे समजून घेणारे भाष्यकार होते, हे साऱ्यांनाच मान्य आहे. त्यांना २००१ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देताना नोबेल समितीनेही अशाच अर्थाचे मत नोंदवले होते.

इस्लामविषयक मते

‘अमंग द बिलीव्हर्स’ (१९८१) आणि ‘बियाँड बिलीफ’ (१९९८) या पुस्तकांतून नायपॉल यांनी इस्लामच्या सद्य:स्थितीचे निरीक्षण केले. पहिल्या पुस्तकासाठी त्यांनी इराण, पाकिस्तान, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांचा प्रवास केला. इस्लामला राजकीय अधिमान्यता देणारे हे चार देश, इस्लाम म्हणजे काय याविषयी किती गोंधळलेले आहेत, हे दाखवून देण्याचा नायपॉल यांचा प्रयत्न ‘अमंग द बिलीव्हर्स’मधून दिसतो. तर ‘बियाँड बिलीफ’मध्ये, धर्मातरित मुस्लिमांच्या पिढय़ान्पिढय़ा, त्यांचे कडवेपण आणि तरीही त्यांचे आपापल्या देशांतील संस्कृतीशी असलेले लिप्ताळे, याचे हृद्य चित्रण नायपॉल करतात. मात्र हे लोक ज्या आक्रमकांमुळे धर्मातरित झाले, त्यांची गय अजिबात करायची नाही, असा नायपॉल यांचा चंगच या पुस्तकातून दिसतो. वास्तविक, इस्लामविषयीची त्यांची मते जाणून घेण्यासाठी त्यांची भारतविषयक पुस्तक-त्रयी वाचली तरी भागते! ‘भाईचारा’ मानणारे कडवे सुन्नी मुसलमान शियांना खिजगणतीत धरत नाहीत, याकडे जळजळीतपणे लक्ष वेधणारे नायपॉल, इस्लाममधील विसंगती दाखवून देण्याचा आणि हा धर्म आधुनिक जगाचा नाहीच, असे सांगण्याचा नेहमी प्रयत्न करीत राहिले होते.

ग्रंथसंपदा

ललित पुस्तके

 • द मिस्टिक मसूर (१९५७)
 • द सफ्रेज ऑफ अलविरा (१९५८)
 • मिग्युल स्ट्रीट (१९५९)
 • अ हाऊस फॉर मि. बिस्वास (१९६१)
 • मि. स्टोन अ‍ॅण्ड द नाईट्स कम्पॅनियन (१९६३)
 • द मिमिक मेन (१९६७)
 • अ फ्लॅग ऑन द आयलॅण्ड (१९६७)
 • इन अ फ्री स्टेट (१९७१) बुकर पुरस्कार
 • ग्युरीला (१९७५)
 • अ बेन्ड इन द रिव्हर (१९७९)
 • द एनिग्मा ऑफ अरायवल (१९८७)
 • अ वे इन द वर्ल्ड (१९९४)
 • हाफ अ लाईफ (२००१)
 • द नाईटवॉचमॅन्स् ऑकरन्स बुक : अ‍ॅण्ड द अदर कॉमिक इनव्हेन्शनस् (स्टोरीज) (२००२)
 • मॅजिक सीड्स (२००४)

ललितेतर पुस्तके

 • द मिडल पॅसेज : इम्प्रेशन्स् ऑफ फाईव्ह सोसायटीज् – ब्रिटीश, फ्रेन्च, अ‍ॅण्ड डच इन द वेस्ट इंडिज अ‍ॅण्ड साऊथ अमेरिका (१९६२)
 • अ‍ॅन ऐरीया ऑफ डार्कनेस (१९६४)
 • द लॉस ऑफ अल डोराडो (१९६९)
 • इंडिया : अ वुन्डेड सिव्हीलाजझेशन (१९७७)
 • अ काँगो डायरी (१९८०)
 • द रिटर्न ऑफ इवा पिरॉन अ‍ॅण्ड द किलिंग्स् इन त्रिनिदाद (१९८०)
 • अमॉग द बिलिवर्ज : अ‍ॅन इस्लामिक जर्नी (१९८१)
 • फाइंडींग द सेंटर : टू नॅरेटिवज् (१९८४)
 • अ टर्न इन द साऊथ (१९८९)
 • इंडिया : अ मिलियन म्युटिनाईज नाऊ (१९९०)
 • बियॉण्ड बिलिफ : इस्लामिक अकस्कझन अमॉग द कन्व्हर्टेड पिपल्स (१९९८)
 • बिटविन फादर अ‍ॅण्ड सन : फॅमिली लेटर्स (१९९९)
 • द रायटर अ‍ॅण्ड द वर्ल्ड : एसेज् (२००२)
 • अ रायटरस् पिपल : वेज् ऑफ लुकिंग अ‍ॅण्ड फिलिंग (२००७)
 • द मास्क ऑफ आफ्रिका : ग्लिम्सेस ऑफ अफ्रीकन बिलिफ (२०१०)

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

नायपॉलसारखा भारतीय नसलेला तरी भारतीय वंशाचा एकमेव जागतिक किर्तीचा लेखक आपल्यातून गेला आहे. जागतिक लेखक की बेघर लेखक म्हणायचे याबाबत मला शंका वाटते. कारण या लेखकाचा जन्म जरी कॅरेबियन बेटांवरील असला तरी या लेखकाचे आयुष्य युरोपात गेले. पूर्ण आयुष्यभर ठरवून, लेखक म्हणून प्रवास करणारा हा भारतीय वंशाचा लेखक. राजकीय मुत्सद्देगिरी त्यांना जमली नाही. जाणिवेशी प्रामाणिक राहून त्यांनी लेखन केले. वडिलांवरील त्याची श्रद्धा ‘बिटविन फादर अ‍ॅण्ड सन’ या पुस्तकातून दिसून येते. नायपॉल हा जागतिक फिरतीवरच असायचा. त्याचा जागतिक संस्कृतीवरील अभ्यास अफाट होता. नायपॉल यांच्या पुस्तकांचा मराठीत फारसा अनुवाद झालेला नाही. ही पुस्तके मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून द्यायला हवीत. आजही त्याच्या पुस्तकाचा संदर्भ कमी झालेला नाही.

– विश्राम गुप्ते, लेखक

व्ही एस नायपॉल यांच्या निधनाने जागतिक स्तरावरचा मूळ भारतीय वंशाचा असलेला एक महत्त्वाचा लेखक आपण गमावला आहे. अर्थात भारतीय वंशाचे असले तरी भारतीय संस्कृती व भारतीय जीवनधारणा यांच्याविषयी त्यांना विशेष आस्था व प्रेम नव्हते. उलट सातत्याने त्यांनी आपल्या सांस्कृतिक मूल्यव्यवस्थेतील कालबाह्य़ गोष्टी वा प्रतीकांवर टीकाच केलेली आहे. तरीही एक निरीक्षण नोंदवता येते की, आपल्या वैशिष्टय़पूर्ण बौद्धिक व वास्तववादी शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या नायपॉल यांच्या एकूणच लेखनांतर्गत  विचारविश्वाच्या तळाशी खास भारतीय म्हणता येईल अशा मानसिकतेशी जखडलेल्या प्रतिमा, आदिबंध व वैचारिक धारणा दिसून येतात. त्यांच्या कादंबऱ्या व प्रवासवृत्तांत यामधून एक सतत अस्वस्थ असलेला, आधुनिकतेचा ध्यास घेतलेला संवेदनशील लेखक जाणवत राहतो. लेखक आणि माणूस म्हणूनही माझ्यासारख्या असंख्य वाचकांचे विचारविश्व समृद्ध करणाऱ्या नायपॉल यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

– प्रवीण बांदेकर, कादंबरीकार

लेखक म्हणून मोठा पण सोबतच वादग्रस्त असा भारतीय वंशाचा कॅरेबियनमध्ये जन्मलेला लेखक आपण गमावला आहे. त्यांच्या कादंबरी या गाजल्याच पण तेवढय़ाच वादग्रस्तही ठरल्यात. त्यांच्या साहित्यावर नेहमी टीका झाली. पण ‘अ बेण्ड इन द रिव्हर’, ‘अ हाऊस फॉर मि. बिस्वास’, ‘अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस’ ही त्यांची काही पुस्तके त्यांच्या भारतीय वंशस्पंदनाबद्दल जाणीव करून देणारी आहेत. भारतीय संस्कृती आणि अनिष्ट रुढी परंपरांवर त्यांनी टीका जरी केली असली तरी ती आपल्याला नाकारून चालणार नाही. भारतावरील किंवा आशिया खंडातील प्रवासवर्णनप्र पुस्तके त्यांनी आवडीने लिहिलेली दिसतात.

– प्रा. प्रदीप गोपाळ देशपांडे, समीक्षक

विसाव्या शतकाच्या मध्यात जगभरात स्थलांतर सुरू होती, विदिआ नायपॉल हे त्याचे प्रतीक होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांच्या पुस्तकांमधून वास्तवाचा दुसरा पैलू दिसून येतो. तसे पाहिले तर नायपॉल कोणत्याही देशाचे नव्हते. कॅरेबियन बेटांवर जन्माला आले असले तरी नायपॉल हे काळ्या लोकांबद्दल कधी सहानुभूतीने बोलले नाहीत. सोबतच भारतावरही त्यांनी बोचरी टीका केली होती. विशिष्ट मातृभूमी नसलेल्या नायपॉल यांनी विस्थापितांच्या वेदना मात्र खूप चांगल्या प्रकारे मांडली. मुख्यत: नायपॉल यांचा ओढा हा ललिततर लिखाणाकडेच जास्त दिसून येतो.

– गणेश विसपुते, लेखक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2018 2:41 am

Web Title: story about creative sensors of cultures
Next Stories
1 ‘भारत इतक्या लवकर बदलणे शक्य नाही’
2 मिस्टिक मॅस्यूर : कादंबरी, चित्रपट आणि घडता इतिहास..
3 व्ही. एस. नायपॉल यांचे निधन
Just Now!
X