राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांची स्पष्टोक्ती

पेडन्यूजबाबत कोणी तक्रार केली किंवा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना संशय जरी आला तरी संबंधित उमेदवाराची सखोल चौकशी केली जाईल. तसेच, पेडन्यूजच्या माध्यमातून होणारा खर्च हा त्या उमेदवाराच्या खर्चात गृहीत धरला जाईल, असा इशारा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिला.

[jwplayer zZz7idXw-1o30kmL6]

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह १० महापालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत म्हणजेच १६ आणि २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. भाजप- शिवसेना युती सरकारची गेल्या सव्वा दोन वर्षांतील कामगिरी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या विरोधकांच्या ताकदीची परीक्षा म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. त्यातच या निवडणुकीच्या माध्यमातून चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे आपली ताकद आजमावीत असल्याने साहजिकच प्रचाराच्या तोफाही धडाडू लागल्या आहेत. पेड न्यूजचेही पेव फुटले आहे. या बाबत निवडणूक आयुक्त सहारिया यांना विचारले असता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी आयोगाने केलेल्या उपाययोजनांविषयी सांगितले.

निवडणुकीदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या तर महापालिका क्षेत्रात पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहिता समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती पेडन्यूज, सोशल मीडियांच्या माध्यमातून होणारा प्रचार यावर बारीक लक्ष ठेवीत आहे. तसेच पेडन्यूजच्या माध्यमातून जातीय, धार्मिक किंवा कोणाचे चारित्र्यहनन करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यास साबंधित प्रसार माध्यमांवरही कठोर कारवाई होईल. फेसबुक किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून उमेदवारांनी प्रचार केला तर हरकत नाही. मात्र त्यासाठी होणारा खर्च संबंधित उमेदवारांच्या खर्चात धरला जाईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचारावर आयोग तसेच पोलिसांचेही लक्ष असून कोणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आल्यास, आचारसंहितेचा भंग करणारा कितीही मोठा असला तरी त्यावर कठोर कारवाई होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

उमेदवारांची माहिती देणार

आपल्या विभागातील उमेदवार कसे आहेत, त्यांच्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीबद्दलची सर्व माहिती यंदा प्रथमच आयोगातर्फे मोठय़ा फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच मतदानाच्या दिवशी स्थानिक वृत्तपत्रांमधूनही ही माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.

[jwplayer K8f2NOFD-1o30kmL6]