आंबेडकरनगरमध्ये पहिल्या टाळेबंदीपासूनच कडक नियमांची अंमलबजावणी

मुंबई : टाळेबंदीचे नियम पाळण्यावरून मध्यमवर्गीय चाळी आणि उच्चभ्रू रहिवासी संस्थांमध्ये रहिवाशांमध्ये खटके  उडत असताना मुंबईतील काही छोटय़ा वस्त्यांनी आदर्श उदाहरणे उभी के ली आहेत. कुरार गाव येथील जुन्या वाघेश्वरी मंदिराजवळील आंबेडकरनगरच्या रहिवाशांनी एकजुटीने वस्तीचे संरक्षण केले. त्यामुळे माणसा-माणसांतील शारीरिक अंतरापेक्षाही अधिक अंतर करोनानेच वस्तीपासून पाळले आहे. मुंबईतील करोना रुग्णांची संख्या कितीही वाढत असली तरीही आंबेडकरनगरमध्ये एकही रुग्ण नाही.

घरकामगार, सफाईकामगार, रंगकाम करणारे अशा कष्टकऱ्यांची आंबेडकरनगर वस्ती ६० कच्च्या घरांची. लोकसंख्या सुमारे ४५०. वस्तीमधून जाणारा रस्ता बाहेरचे लोकही वापरत. टाळेबंदीच्या पहिल्याच आठवडय़ात भरपूर भाजीवाले वस्तीत येऊ लागले. दरम्यान, नातलग, मित्रमंडळी यांच्याकडून आणि बातम्यांमधून काय काळजी घ्यायची, याची माहिती रहिवाशांना मिळू लागली होती. वस्तीत एक वृद्ध सावंतबाबा आहेत. सगळे जण त्यांचे ऐकतात. त्यांनी रस्त्यावर राखण करत बाहेरच्या माणसांना आत येण्यास मनाई केली. वस्तीत कोणाला यायचे-जायचे असल्यास सावंतबाबांची परवानगी घेतली जाई. त्यांनी रहिवाशांची एक बैठक घेऊन काही नियम ठरवले. ते सर्वानी चोख पाळले. वस्तीतल्या महिलांनी जुन्या साडय़ा आणि काठय़ांच्या साहाय्याने संपूर्ण वस्तीला कुं पण घातले. सर्व रस्ते स्वच्छ केले.  येथील रहिवासी रेश्मा बारस्कर या घरकामगार आहेत. त्यांचा मुलगा काम करत असलेल्या सॅनिटायजरच्या कंपनीने वस्तीसाठी सॅनिटायजरचा पुरवठा केला. ‘सध्या टाळेबंदी शिथिल झाल्यावर वस्तीचेही काही नियम शिथिल झाले आहेत, मात्र पहिल्या टाळेबंदीपासूनच वस्तीने कडक नियम अमलात आणले. एकमेकांची विचारपूसही दारातूनच होत असे. वस्तीत काही घटना घडली तरी नेमकीच माणसे जात. कचरा साचून राहिल्याने दरुगधी पसरत असे. त्यामुळे सुका कचरा जाळायला आणि ओला कचरा खडय़ात पुरायला सुरुवात के ली,’ अशी माहिती रेश्मा यांनी दिली. वस्तीच्या संघटित प्रयत्नांचे यश म्हणजे येथे एकालाही करोनाची बाधा झालेली नाही. त्यामुळे घरकामगारांवरील निर्बंध न उठवणाऱ्या रहिवासी संस्थांनाही आता पुनर्विचार करणे भाग पडेल.

अशी घेतली काळजी

* या वस्तीत ११ घरांमागे एक शौचालय आहे. ते लखलखीत स्वच्छ केले. तिथे साबण, सॅनिटायजर ठेवले. ही व्यवस्था कायम राखण्यासाठी एक माणूस नेमला. प्रत्येक घरामागे २०० रुपये वर्गणी सुरू केली. शौचालय वापरण्याआधी आणि नंतर कुलूप-किल्ली, दाराच्या कडय़ाही र्निजतुक करणे, काही वेळ दरवाजा उघडा ठेवून हवा खेळती राहील, अशीही व्यवस्था के ली.

* घराबाहेर मुखपट्टीशिवाय यायचे नाही, कामासाठी बाहेर गेलेल्यांनी परतल्यावर गरम पाण्याने आंघोळ करणे, कपडे धुणे असे नियम केले.

* दोन-तीन जणांनी बाहेर जाऊन सगळ्यांसाठी सामान आणणे सुरू केले. लहान मुलांच्या खेळण्याच्या वेळा ठरवल्या. खेळण्याची जागा स्वच्छ ठेवली. ताण घालवण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकदा पापड लाटण्याचा घाटही घातला होता.