करोना प्रसार वाढू लागल्यामुळे पालिकेचा इशारा; निर्बंध पाळण्यासाठी ५५० सोसायटय़ांना नोटीस

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली असून करोनाविषयक नियम पायदळी तुडवत सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या चेंबूरमधील नागरिकांच्या बेफिकीरपणाला पायबंद घालण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या पाच दिवसांमध्ये चेंबूरमधील तब्बल ५५० इमारतींवर पालिकेने नोटीस बजावली आहे. करोनाविषयक नियमांचे पालन न केल्यास इमारत टाळेबंद करण्याचा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रतिदिन करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना मर्यादित वेळेत उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिल्यानंतर रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. मुंबईतील बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, पर्यटनस्थळी गर्दी होऊ लागली आहे. रस्त्यांवरही नागरिक आणि वाहतुकीची प्रचंड वर्दळ होत आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार पालिकेने सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर, सामाजिक अंतराचा नियम बंधनकारक करण्यात आला आहे. त्याचबरोबर घराबाहेर पडल्यानंतर वेळोवेळी सॅनिटायझर वा साबणाने हात स्वच्छ करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

सर्वसामान्यांसाठी मर्यादित वेळेत उपनगरीय लोकल सुरू झाल्यानंतर नागरिक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडताना दिसत आहेत. प्रवाशांच्या गर्दीमुळे सार्वजनिक वाहनांमध्ये सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अनेक जण मुखपट्टीचा वापरही टाळू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा करोना संसर्ग डोके वर काढण्याची धास्ती निर्माण झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या ‘एम-पश्चिम’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ९८ टक्के रुग्ण निवासी इमारतीमध्ये असल्याचे आढळले आहे. तसेच इमारतींमध्ये करोनाविषयक नियम धाब्यावर बसविण्यात येत असून पुन्हा एकदा इमारतींमधील बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे.

बेजबाबदारपणे वागणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय ‘एम-पश्चिम’ विभागाने घेतला आहे. करोनाविषयक नियमांचे पालन न करणारे रहिवाशी हेरून ‘एम-पश्चिम’ विभागाने गेल्या पाच दिवसांमध्ये तब्बल ५५० इमारतींवर नोटीस बजावली आहे. बाहेरील व्यक्तींना सोसायटीमध्ये मर्यादित प्रवेश द्यावा, सोसायटीत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक रहिवाशाची शारीरिक तापमान तपासणी करावी, इमारतीमधील रहिवाशाला करोनाची बाधा झाल्यास नियमानुसार १४ दिवस विलगीकरण बंधनकारक करावे, बाधिताच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींची चाचणी करावी, करोनाची लक्षणे जाणवणाऱ्या रहिवाशांनी तात्काळ तपासणी करून घ्यावी, असे निर्देश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. करोनाविषयक नियमांचे पालन न केल्यास इमारत टाळेबंद करण्याचा इशाराही या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

चेंबूर आणि आसपासच्या परिसरात करोनावाढीचा दर वाढताना दिसत आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विभागातील झोपडपट्टय़ांच्या तुलनेत इमारतींमध्ये अधिक बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे नियमांचे पालन करण्याबाबत सोसायटय़ांवर नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

पृथ्वीराज चव्हाण, साहाय्यक आयुक्त, ‘एम-पश्चिम’