करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. अनेक परदेशी नागरिक या काळात भारतात अडकले होते. कालांतराने या नागरिकांना आपल्या मायदेशी परतण्याची सोय केंद्र सरकारने करुन दिली. मात्र घानाचा २३ वर्षीय फुटबॉलपटू रँडी जुआन मुलर हा लॉकडाउन काळात घरी परतण्यासाठीचे सर्व मार्ग बंद झाल्यामुळे ७२ दिवस मुंबई विमानतळावर राहत होता. विमानतळातील सुरक्षा अधिकाऱ्यांनीही त्याला या काळात मदत करत तात्पुरती सोय करुन दिली. अखेरीस युवा सेना अध्यक्ष आणि आमदार आदित्य ठाकरे यांना रँडी मुलरविषयी समजताच त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांमार्फत त्याची वांद्रे येखील हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली आहे. मुंबई मिरर वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

२१ मार्च रोजी रँडी घरी जाण्यासाठी मुंबई विमानतळावर परतला होता. मात्र त्याचदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे त्याचे घरी परतण्याचे सर्व मार्ग बंद झाले. विमानतळावरील CISF, पोलीस आणि स्थानिक कर्मचाऱ्यांनी अखेरीस रँडीची विमानतळावरच राहण्याची सोय केली. स्वतःजवळचे पैसे संपत आल्यामुळे अनेक दिवस रँडी विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी दिलेले समोसे, फ्राईड राईस खाऊन दिवस काढत होता. विमानतळावरील स्वच्छतागृहात रँडी आपले कपडे धुण्यापासून इतर कामं करत होता. वेळ घालवण्यासाठी प्रवाशांनी विमानात विसरलेली पुस्तकही रँडीने या काळात वाचली. घानामधील कुमासी शहरात राहणारा रँडी नोव्हेंबर २०१९ मध्ये भारतात आला. केरळमधील ORPC Sports Club कडून खेळण्याची रँडीला संधी मिळाली होती.

“मी सहा महिन्यांच्या व्हिसावर भारतात आलो होतो. आम्हाला प्रत्येक सामन्याचे किमान २ ते ३ हजार रुपये मिळायचे. पण दुर्दैवाने मला फारसे सामने खेळायला मिळाले नाहीत पण इकडे येण्यासाठी मला अंदाजे दीड लाखांचा खर्च करावा लागला. लॉकडाउन जाहीर होणार आहे असं समजताच मी केनिया मार्गे घानाला जाणाऱ्या विमानाचं तिकीट काढलं होतं. पण यादरम्यानच्या काळात लॉकडाउन जाहीर झालं, आणि मी भारतातच अडकलो. माझी राहण्याची कुठेही सोय होत नव्हती म्हणून अंधेरी येखील पोलिसांनी मला विमानतळावर राहण्याचा सल्ला दिला. मी अखेरीस विमानतळावरच राहण्याचा निर्णय घेतला. मी सकाळी लवकर उठायचो. सर्व कामं आटपली की जवळच्या बागेत एकटा फिरायचो. तिकडची लोकं मला खाण्यासाठी समोसे द्यायची. CISF च्या काही अधिकाऱ्यांनी मला जेवणासाठी पैसे दिले, पण एअरपोर्टवर सर्व गोष्टी महाग असल्यामुळे मी पैसे वाचवण्याकडे भर दिला. बाहेरील लोकांना ज्यावेळी भारतात आणत होते, त्यावेळी मलाही वाटायचं की मी सुद्धा घरी जाईन.” रँडी आपला अनुभव सांगत होता.

दरम्यानच्या काळात बाहेरील देशांमधून आपल्या घरी परतलेल्या अनेकांनी रँडीला मदत केली. काही प्रवाशांनी त्याला पैसे तर काहींनी त्याला वाचण्यासाठी पुस्तकं दिली. ही पुस्तकं वाचल्यामुळेच मला या काळात नैराश्य आलं नाही असंही रँडीने आवर्जून सांगितलं. माझ्यापेक्षा अनेकांना या काळात हाल सोसावे लागले याची मला कल्पना होती. पण पैसे संपत आल्यामुळे माझी समस्या कायम होती. मला फारशे सामने खेळायला मिळाले नाहीत, त्यामुळे माझ्याकडे फार थोडे पैसे शिल्लक होते. मी घानाला परिवाराशी संपर्क साधत माझ्या तिकीटासाठीचे पैसे जमवायला सांगितलं. अखेरीस रँडीने ट्विटरवर आपल्याला मदतीची गरज असल्याचं जाहीर केलं. आदित्य ठाकरेंना याविषयी कळताच त्यांनी स्थानिक युवा सेनेच्या अधिकाऱ्यांना सांगून रँडीची वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये सोय केली. हॉटेलमध्ये आल्यानंतर रँडीने घानाच्या भारतामधील उच्चायुक्तांशी संपर्क साधून आपली कहाणी सांगितली. त्याच्यासाठी विमानाची लवकरात लवकर सोय करण्यात येईल असं आश्वासन त्याला देण्यात आलं आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांच्या काळात भारतीय लोकांनी माझा चांगला सांभाळ केला, त्यामुळे यापुढेही संधी मिळाल्यास आपण भारतात जरुर येऊ असं रँडीने सांगितलं.